yuva MAharashtra शेतीमालावर प्रक्रिया, पॅकिंग व ब्रँड करून परदेशात विक्री करायला हवी - खा. विशाल पाटील

शेतीमालावर प्रक्रिया, पॅकिंग व ब्रँड करून परदेशात विक्री करायला हवी - खा. विशाल पाटील

फोटो सौजन्य  - दै. पुढारी

सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जानेवारी २०२५

सांगली बाजार समितीत आलेल्या हळद, बेदाणा यासह अन्य शेतीमालावर प्रक्रिया करून तो मूल्यवर्धित करावा. पॅकिंग करून ब्रँड करून परदेशात विक्री करायला हवी. नेटवर्क उभारण्यासाठी बाजार समिती आणि व्यापार्‍यांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे सांगलीच्या शेतीमालाचा नावलौकिक आणखी वाढेल, असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ शुक्रवारी झाला. यावेळी ऑनलाईन सेवा, बाजार समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन झाले. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक प्रशांत पाटील मजलेकर, काडाप्पा वारद, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील, सचिव महेश चव्हाण, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, हमाल नेते बाळासाहेब बंडगर उपस्थित होते.


खासदार पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील यांनी बाजार समितीची निर्मिती शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून केली. संचालक मंडळ आणि व्यापारी यांनी बाजार समितीचा विस्तार केला. बाजार समितीत चुकाही घडल्या. चुका घडून सुद्धा ही बाजार समिती आजही भक्कमपणे उभी आहे. माजी मंत्री घोरपडे म्हणाले, बाजार समितीत राजकारणाचा परिणाम आहे. राजकारणामुळे बाजार समितीत होणारी उलाढाल आणि व्यापार बदलला. पुढच्या काळात बाजार समितीकडून शेतकरी, व्यापार्‍यांच्या अपेक्षा बदलणार आहेत. शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच या मार्केट कमिटीचे काम करावे. सभापती सुजय शिंदे म्हणाले, बाजार समितीचे उपन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डाळिंब, द्राक्ष रासायनिक अंशविरहीत उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांना बांधावर मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे.