yuva MAharashtra जैन महामंडळाच्या गतीमान कामकाजासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार - ललित गांधी

जैन महामंडळाच्या गतीमान कामकाजासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार - ललित गांधी

           फोटो सौजन्य  : दै. ललकार 

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जानेवारी २०२५
जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक सुरक्षितता व गरजु लोकांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या 'जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ' चे कामकाज गतीमान व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित होणार असल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असुन महामंडळाचे कामकाज प्रभावीपणे सुरू होऊन समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तिपर्यंत याचे लाभ पोहोचले पाहीजेत अशी भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन महामंडळाचा अहवाल सादर करून आढावा बैठक घेण्याची विनंती केली त्याप्रसंगी ते बोलत होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेण्यास मान्यता देवुन तशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. सदर बैठकीस अल्पसंख्यक कार्य मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्यक कार्य राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग, प्रधान सचिव वित्त, प्रधान सचिव नियोजन, सचिव अल्पसंख्यक कार्य विभाग, सहसचिव अल्पसंख्यक कार्य विभाग, जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी ललित गांधी यांनी अल्पसंख्यक विभागाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी सहसचिव मो.बा. ताशिलदार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जी.पी. मगदूम यांचे समवेत बैठक घेवुन पहिल्या १०० दिवसाचा कृती आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासंबंधी चर्चा करून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.