yuva MAharashtra धनंजय मुंडे अडचणीत; हत्या प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप उफाळले !

धनंजय मुंडे अडचणीत; हत्या प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप उफाळले !

फोटो सौजन्य  - Wikipedia 

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० जानेवारी २०२५


मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण होत असताना, या प्रकरणाने राजकीय रंग घेतला आहे. तपास यंत्रणा प्रकरणाचा शोध घेत असली तरी विरोधकांनी थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कारण, संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

शेल कंपन्या आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप

धनंजय मुंडे यांच्या मालकीच्या शेल कंपन्यांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, यात ईडीला समांतर तपास करण्याची मागणी केली आहे.

मनी लॉन्डरिंग प्रकरणाची चौकशी होणार?

मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा सेल्स इंडस्ट्रियल प्रा. लि. या कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. यामध्ये मंत्री मुंडे, त्यांची पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासह काही अन्य जण संचालक असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांमधून पैशांची देवाणघेवाण अनियमित असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला असून, त्याचा तपास एसआयटीच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लाचखोरीच्या आरोपांमुळे वाढले संकट

वाल्मिक कराड याने एका ऊर्जा उत्पादन कंपनीकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप झाला आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही बाब सरकारसाठीही डोकेदुखी ठरू शकते.

निवडणुकीसंदर्भातील नवी याचिका

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या विधानसभा निवडणुकीतील अर्ज वैध ठरवण्यात आल्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यांनी मुंडे यांच्यावर आर्थिक बाबी लपवल्याचा आरोप केला आहे. तसेच, मुंडे यांच्याशी आपले कायदेशीर विवाह संबंध असल्याचा दावा केला आहे.

राजकीय वातावरण तापले, विरोधक आक्रमक

या आरोपांमुळे धनंजय मुंडेंवरील राजकीय दबाव वाढला आहे. भाजप नेते सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनीही त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनं सुरू असून, मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.