| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जानेवारी २०२५
मंत्रीपदाप्रमाणेच सांगलीच्या पालकमंत्रीपदासाठी अनेकांना हुलकावणी देत संघाच्या मुशीत वाढलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासमोर जिल्ह्यातील समस्या सोडवण्याचे जसे आव्हान आहे तसेच पुन्हा एकदा पक्ष वाढीला महत्त्व देण्याचे हे आव्हान आहे.
एका हातात प्रशासनाचा तर दुसऱ्या हातात जिल्ह्यातील भाजप नेत्यांचा हात घेऊन, जिल्ह्याला व पक्षाला विकासाच्या महामार्गावर नेण्याचे काम चंद्रकांत दादांना करावे लागणार आहे. जिल्ह्यातील सिंचन योजनांना गती देणे हे जसे महत्त्वाचे आहे तसेच या योजना कायम स्वरूपी चालणेही महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे तो वीज बिलाचा. अनेकदा या सिंचन योजनांची वीज बिले टंचाई निधीतून भागवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
गेल्या दहा वर्षात अनेक राजकीय संदर्भ बदलले आहेत. या कालावधीत विरोधी पक्षात असलेले दुसऱ्या फळीतील नेते भाजपच्या वळचणीला आले आहेत. त्यामुळे नव्या जुन्यातील वाद मिटवून पक्षाला पुढे नेण्याचे आव्हान चंद्रकांतदादांच्यावर आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याने सांगली व मिरज या मतदार संघाबरोबरच यावेळी पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिराळा व जत मधून भाजपला नव्याने आमदार दिले आहेत. मात्र तरीही सत्तेच्या साठमारीत या जिल्ह्याला मंत्रीपद नाकारून अन्याय केल्याची भावना जनतेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
आगामी काळात मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुका येणार आहेत. या सर्व ठिकाणी भगवा फडकवण्याची जिद्द भाजपा कार्यकर्त्यांनी बाळगली आहे. अशावेळी त्यांना बळ देण्याचे काम भाजपकडून अपेक्षित आहे. पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपा अंतर्गत जे गट तट आहेत, त्यातील मतभेद मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी त्यांचा स्वतंत्र असलेला गट महत्वाची भूमिका बजावू शकतो. याकरिता सर्वांना सोबत घेऊन जाणारे बेरजेचे राजकारण चंद्रकांत दादांच्याकडून अपेक्षित आहे.
यापूर्वी 2014 ते 2019 या कालखंडात जिल्ह्याचे पालकत्व चंद्रकांत दादांच्याकडे होते. त्यामुळे भाजप बरोबरच विरोधी पक्षातही त्यांना मानणारा एक स्वतंत्र गट आहे. त्यालाही चंद्रकांत दादांना सांभाळावे लागणार आहे. हे आव्हान चंद्रकांतदादा कसे पेलतात, यावर त्यांचा कार्यकाल अवलंबून असणार आहे.