yuva MAharashtra भारतीय नर्सला 'या' देशात मोठा धक्का, राष्ट्रपतींनी दिली फाशीच्या शिक्षेला मंजुरी !

भारतीय नर्सला 'या' देशात मोठा धक्का, राष्ट्रपतींनी दिली फाशीच्या शिक्षेला मंजुरी !


| सांगली समाचार वृत्त |
साना - दि. १ जानेवारी २०२५
यमनमधील भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिची फाशी रद्द व्हावी यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत होते. पण, ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. यमनचे राष्ट्रपती रशद-अल-अलीमी यांनी तिच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. निमिषा यमनी नागरिकाच्या हत्या प्रकरणात 2017 पासून तुरुंगात आहे. तिच्या फाशीवर एक महिन्यामध्ये अंंमलबजावणी करण्यात येणार आहे. भारत सरकारला या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

निमिषा प्रिया ही केरळमधील पल्लकडची राहणारी आहे. ती व्यवसायानं नर्स आहे. तिनं काही वर्ष यमनमधील खासगी हॉस्पिटलमध्ये काम केलं आहे. तिचा नवरा आणि अल्पवयीन मुलगी आर्थिक कारणामुळे 2014 साली भारतामध्ये परत आले. त्याचवर्षी यमनमध्ये गृहयुद्ध सुरु झाले. त्यामुळे नवे व्हिसा मिळणे बंद झाले. त्यानंतर ते दोघं निमिषाकडं जाऊ शकले नाहीत.

2015 साली निमिषा प्रियानं सनामध्ये स्वत:चं क्लिनिक सुरु करण्यासाठी तिचा सहकारी अब्दो महदीकडं मदत मागितली होती. कारण यमनमधील कायद्यानुसार तिथं फक्त यमनमधील नागरिकांनाच क्लिनिक आणि व्यावसायिक फर्म सुरु करण्याची परवानगी मिळू शकते. पण, दोघांमध्ये वाद झाला.


नर्सच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, अब्दोनं फंडामध्ये अफरातफर केली होती. निमिषानं त्याचा विरोध केला. रिपोर्ट्सनुसार अब्दोनं निमिषाचा पासपोर्ट जप्त केला तसंच तिच्या लग्नाचे फोटो देखील चोरले होते. त्यानं फोटोमध्ये फेरफार करत नर्ससोबत लग्न केल्याचा दावा केला होता.

निमिषानं स्वत:चा पासपोर्ट मिळवण्यासाठी अब्दोला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं होतं. पण, औषधाचा डोस जास्त झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. यमनमधून पळण्याच्या प्रयत्नाला निमिषाला अटक करण्यात आली. 2018 साली तिला हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. 2020 साली तिला मृत्यूची शिक्षा सुनावली. 2023 साली सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवली. तिच्याकडं ब्लड मनी हा शेवटचा पर्याय शिल्लक होता. पण, तो प्रयत्नही अयशस्वी झाला. आता राष्ट्रपतीनंही तिच्या फाशीवर शिक्कमोर्तब केलं आहे.