yuva MAharashtra हजारो कोटींची संपत्ती अन् 'लोढा' नाव वापरण्याचा वाद, मंगल प्रभात लोढांची मुलं कोर्टात !

हजारो कोटींची संपत्ती अन् 'लोढा' नाव वापरण्याचा वाद, मंगल प्रभात लोढांची मुलं कोर्टात !

फोटो सौजन्य  - गुगल  फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ जानेवारी २०२५

मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहेत. कॅबिनेट मंत्रिपदही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे व्यवसायाची संपूर्ण धुरा लोढांचे हे दोन्ही मुलं सांभाळतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लोढांच्या दोन्ही मुलांमध्ये व्यावसायिक कारणावरून वाद आहे. बांधकाम क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातील श्रीमंत आमदारांच्या यादीत असणारे एक नाव म्हणजे मंगल प्रभात लोढा. हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या लोढा कुटुंबीयांमध्ये आता व्यावसायिक कारणास्तव वाद निर्माण झाला आहे. या वृत्ताची खातर जमा करण्यासाठी लोढा कुटुंबियाशी संपर्क साधला असता, त्यांचा वा त्यांच्या वकिलाचा संपर्क होऊ शकला नाही.

मंगल प्रभात लोढा यांच्या प्रतिथयश कुटुंबाला तडा गेला असून त्यांचे दोन्ही सुपुत्र अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा या बंधूंमध्ये 'लोढा' हे नाव वापरण्यावरून सुरू झाला आहे. किंबहुना, या वादानं कोर्टाची पायरी चढलीय. धाकट्या भावाला (अभिनंदन) 'लोढा' हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिषेक लोढा यांच्या कंपनीने अभिनंदन लोढा यांच्या कंपनीविरोधात याचिका दाखल केलीय. 


सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंबईतील आमदार मंगल प्रभात लोढा यांना दोन सुपुत्र आहेत. थोरल्या मुलाचं नाव अभिषेक, तर धाकट्या मुलाचं नाव अभिनंदन आहे. त्यातच अभिषेक लोढा यांच्या 'मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड'ने गेल्या आठवड्यांत अभिनंदन यांच्या 'हाऊस ऑफ अभिनंदन' लोढा या कंपनी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे.

या याचिकेत अभिषेक लोढांनी दावा केलाय की, 'लोढा' या व्यापारचिन्हाचे स्वामित्वहक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही. त्यामुळे लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करावी. अभिषेक लोढा यांनी केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, आपल्या कंपनीकडे लोढा व्यापारचिन्हाचे नोंदणीकृत मालकीहक्क आहेत. तसेच, याआधी किंवा आजपर्यंत अभिनंदन यांच्या कंपनीला हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हे नाव वापरण्यास आपण ना हरकत दिली नाही. लोढा हे नाव सर्वदूर करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून आमच्या कंपनीने प्रयत्न केले आहेत. तसेच, त्यासाठी कंपनीने एकाच दशकात 1700 कोटी रुपये खर्च केले आहेत.

'लोढा समूहाचे नाव प्रतिष्ठित मानले जाते आणि कंपनीने गेल्या दशकात देशांतर्गत मालमत्ता विक्रीतून 91 हजार कोटी रुपये कमावले आहेत. लोढा समूहाने जाहिरातीवर कोट्यवधी खर्च केले आहे,' असा दावाही अभिषेक यांनी केला आहे. त्यामुळे अभिनंदन लोढा यांनी हे नाव वापरू नये, अशी मागणी करत, 'वापरल्यास पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई'च्या दाव्याची मागणी त्यांनी केलीय तसेच, याचिकेत अभिषेक लोढा यांनी म्हटले आहे की, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लोढा समूहाची प्रमुख कंपनी आहे. लोढा समूहातील कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा करार 2015 पर्यंत होता. 2015 मध्ये अभिनंदन लोढा हे लोढा समूहापासून वेगळे होतील आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करतील, असा निर्णय घेण्यात आला होता.

मार्च 2017 मध्ये आणि नंतर 2023 मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला. 2023 मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे. न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर मंगळवारी (21 जानेवारी) सकाळच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सर्वप्रथम सुनावणीसाठी आली.

अभिषेक लोढा यांनी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याची मागणी केली असल्याने त्यांच्या याचिकेवर आपण सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्या. पितळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेणाऱ्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे दुपारच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सादर करण्यात आली. सुनावणीच्या वेळी एकलपीठाने हा वाद दोन भावांमधील भांडणाशी संबंधित आहे का? अशी विचारणा अभिषेक यांच्या वकिलांकडे केली. त्याला सकारात्मक उत्तर देऊन अभिषेक आणि अभिनंदन यांच्या लोढा या व्यापारचिन्हावरून वाद सुरू असल्याचे अभिषेक यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, एकलपीठाने प्रकरणाची सुनावणी 27 जानेवारी रोजी ठेवताना त्यावेळी अंतरिम दिलासा देण्याच्या मागणीवर युक्तिवाद ऐकण्याचे स्पष्ट केले.