| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. ४ जानेवारी २०२५
शिराळा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती शिराळा यांच्यावतीने शिराळा-करमाळा रोड, मार्केट यार्ड, शिराळा येथे उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हस्ते नुकताच जनावरे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. या जनावरांच्या पहिल्याच आठवडे बाजाराला पशुपालकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी गाय, म्हैस, बैल, शेळ्या मोठ्या संख्येने बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत्या. तसेच या पहिल्याच जनावरे बाजार दरम्यान तब्बल पाच ते दहा लाखांची उलाढाल झाली. 70 ते 100 वर्षांच्या परंपरा असणारे मांगले व चरण येथे भरत असणारा जनावरे बाजार कोरोना व इतर अडचणीमुळे बंद झाले होते. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना जनावर खरेदी व विक्री करण्यासाठी वडगाव कराड या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक हानी होत होती. शिराळा जनावरे बाजारमुळे शेतकऱ्यांचा वेळ तसेच पैसेही वाचणार आहेत व शेतकऱ्यांची फसवणुकी होणार नाही. हा बाजार कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी बाजार समिती शिराळा सर्व सुख-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तसेच सोमवार हा वडगाव येथे मोठा बाजार भरला जातो यामुळे तालुक्यातील सर्व व्यापारी वडगाव येथे खरेदी व विक्री करण्यासाठी जात असतात. त्याचा परिणाम शिराळा येथील बाजारावर होऊ शकतो. या अनुषंगाने शेतकरी, व्यापारी व बाजार समितीच्या सर्व पदाधिकारी या सर्वांनी असा निर्णय केला की इथून पुढे शिराळा मधील होणारा जनावरांचा आठवडे बाजार बुधवार दि. ०८/०१/२०२५ रोजी पासून प्रत्येक बुधवारी कायमस्वरूपी भरवण्यात येणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपट जयसिंग चरापले, उपसभापती विजय बाबुराव महाडिक, संचालक सुजित आबासाहेब देशमुख, आनंदा रंगराव पाटील, सुनंदा बाळासो पाटील, हरिभाऊ पांडुरंग पावणे, प्रताप दिलीप दिलवाले, वासिम नयुम मोमीन, जयश्री दाजीबा पाटील, सचिव गोविंद पाटील, बाबासो पाटील, दत्ता माळी, विपुल पाटील, सचिन गायकवाड तसेच शिराळा तालुक्यातील शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.
बातमी सौजन्य : अभिजित शिंदे