yuva MAharashtra सक्षमीकरणासाठी लाडक्या बहिणींना जिल्हा वार्षिक योजनेतून सर्व प्रकारे मदत करण्याचे चंद्रकांतदादांचे आश्वासन !

सक्षमीकरणासाठी लाडक्या बहिणींना जिल्हा वार्षिक योजनेतून सर्व प्रकारे मदत करण्याचे चंद्रकांतदादांचे आश्वासन !

फोटो सौजन्य  - फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जानेवारी २०२५

एखादी कुटुंबवत्सल महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून अनेक प्रकारे काम करीत असते, कुणी घर कामासाठी जात असते, कुणी कपड्याच्या अथवा अन्य दुकानात सेल्समन म्हणून काम करत असते, अगदी उच्च शिक्षित महिलाही नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडते. यातील एक मोठा वर्ग महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

घरगुती उत्पादनाच्या माध्यमातून ती प्रसंगी दारोदारी फिरून आपल्या वस्तू विकत असल्याचे कौतुकास्पद कार्य करते. ही तिची वणवण थांबवावी म्हणून शासन पुढाकार घेताना दिसत आहे. यासाठी शहरात मॉल उभारण्याबरोबरच मार्केटिंग सिस्टीम राबविण्याचा शासनाचा इरादा आहे. याचसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जिल्ह्यातील आपल्या लाडक्या बहिणीसाठी पुढे सरसावले आहेत.

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनामुळे त्यांची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. सांगली जिल्ह्यात आयोजित ‘मिनी सरस २०२५’ प्रदर्शनात त्यांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या उत्पादनांची खरेदी केली.


कार्यक्रमात, महिला उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी पाटील यांनी महिला समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच टाटा उद्योग समूहासोबत महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्याचे नमूद केले. त्यांचा विश्वास आहे की महिलांना घर चालवण्यासाठी मदत होईल, ज्यामुळे त्या आत्मनिर्भर बनतील.

प्रदर्शनात एकूण ७५ स्टॉल्स सहभागी झाले असून, त्यात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे. याचा उद्देश महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे.