| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ जानेवारी २०२५
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो असे नेहमीच सांगितले जाते. त्याची अनेक उदाहरणेही आपल्या नजरेस पडत असतात. गळ्यात गळे घालणारे राजकारणातील मित्र एकमेकांचे गळे धरण्यास उद्युक्त होतात. तर एकमेकांच्या पायात पाय घालणारे राजकीय शत्रू अचानक मित्र बनतात, हे आपल्यासाठी नवीन नाही. सध्याचे राष्ट्रीय वातावरण हेही यापेक्षा वेगळे नाही.
गेली पाच वर्षे एकमेकांवर यथेच्छ टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सूर पुन्हा जुळताना दिसतायेत. त्याचेच प्रतिबिंब दोघांच्याही बदललेल्या राजकीय उत्तरांमध्ये आणि दिलेल्या संकेतांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये पडद्याआडून काही वेगळ्या खेळी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
येथील जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या समारंभात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी विचारलेल्या राजकीय प्रश्नांना त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
राज की उद्धव? परफेक्ट राजकीय उत्तर !
संपूर्ण प्रकट मुलाखतीत राजकारणात काहीही शक्य असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी वारंवार जोर दिला. सरतेशेवटी रॅपिड फायर (झटपट उत्तरे) प्रश्नांमध्येही त्यांनी परिपक्व राजकीय नेत्याचे दर्शन घडवले. राज ठाकरे की उद्धव ठाकरे ? या प्रश्नाला त्यांनी अतिशय चाणाक्षपणे उत्तर दिले. राजकारणात काहीही पक्के नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले. आता राजही मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, असे म्हणत संवादाचा मार्ग आपल्यावतीने सुरू असेल असे संकेत त्यांनी दिले.
अजित पवार की एकनाथ शिंदे ?
अजित पवार की एकनाथ शिंदे, असा प्रश्न विचारला असता, दोघांशीही चांगले संबंध असल्याचे फडणवीस म्हणाले. शिंदेसाहेबांशी आणि माझी जुनी मैत्री आहे आणि अजितदादांमध्ये राजकीय परिपक्तता असल्यामुळे त्यांचे आणि माझे सूर जुळतात, असे फडणवीस यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्यात दोस्ताना?
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तीन वेळा त्यांची भेट घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनीही नागपुरात अधिवेशन काळात त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यानंतर फडणवीस यांच्या नक्षलवादविरोधी चळवळीच्या भूमिकेचे 'सामना'तून जोरदार कौतुक केले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाकरे-फडणवीस यांच्यातील जवळीकतेची चर्चा होत आहे.