| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २२ जानेवारी २०२५
सहकार महर्षी स्व. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला वैभवाच्या शिखरावर नेले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार व सामान्य माणसांचे जीवनमान उंचावत, राज्याच्या ग्रामीण भागाचा त्यांनी कायापालट केला. असे प्रतिपादन आमदार. सत्यजित देशमुख यांनी केले. स्व. गुलाबराव पाटील यांच्या 36 व्या स्मृतिदिनानिमित्त गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
संकुलाचे संस्थापक तथा काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी ऋतुराज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रास्ताविकामध्ये संकुलाच्या वाटचालीचा आढावा सादर केला.
यावेळी बोलताना आ. देशमुख पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल हे स्व. गुलाबराव पाटील यांचे जिवंत स्मारक आहे. त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे, त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत, असे सांगून आ. देशमुख म्हणाले की, पृथ्वीराज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भक्कम बांधले आहे. जनता त्यांच्याबरोबर आहे. मात्र खेकडा प्रवृत्तीच्या लोकांमधून त्यांना बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. सकारात्मक ऊर्जेच्या राजकारणातून जनहितासाठी योग्य निर्णय घेण्याचे वेळ आली आहे, असे आ. देशमुख म्हणाले.
स्व. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या विस्तारात आणि सांगलीच्या विकासासाठी तुम्हाला शासनाचे सहकार्य मिळवून देण्यात मी सदैव तुमच्या बरोबर आहे, असे आश्वासन आ. सत्यजित देशमुख यांनी यावेळी बोलताना दिले. काँग्रेस पक्षाबद्दल महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत असताना ते म्हणाले की, स्व. वसंतदादा पाटील स्व. गुलाबराव पाटील, स्व शिवाजीराव देशमुख यांच्या काळातील संघटन आता राहिले नाही. विधानसभा निवडणुकीत स्व पक्ष्यांनी तुम्हाला मदत केली नाही. या पुढील काळात संघटनात्मक रचनेचा अभ्यास करून पुढील वाटचाल निश्चित करा असे आवाहन आ. देशमुख यांनी पृथ्वीराज पाटील यांना दिले.
यावेळी आपल्या मनोगतात पृथ्वीराज पाटील म्हणाले की, स्व. गुलाबराव पाटील यांनी 40 वर्षे जिल्हा बँक आणि सहकार क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय संस्थेत उच्च पदावर काम केले. स्व. शिवाजीराव देशमुख साहेब जसे सुसंस्कृत व विनयशील नेते होते, तसेच माझे मित्र आ. सत्यजित देशमुख हेही आपल्या पित्याप्रमाणेच आहेत. गुलाबराव पाटील शैक्षणिक संस्थेच्या बाबत बोलताना हे गुलाबराव पाटील यांचे जिवंत स्मारक आहे. होमिओपॅथी मेडिकल कॉलेजला सर्वांच्या सहकार्याने नॅकचे 'बी प्लस' मानांकन मिळाले आहे, ही कौतुकाची बाब आहे.
आ. सत्यजित देशमुख यांनी सांगलीसाठी मी तयार केलेला विकास आराखडा सत्यात उतरवण्यासाठी आमदार म्हणून मला मदत करावी. निवडणुका येतील आणि जातील मी पुन्हा जनतेचा कौल घेऊन समाजकारणासाठी आमदार होणार आहे, असा निर्धार पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
शेवटी प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथी यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन डी बिरनाळे यांनी केले. यावेळी विश्वस्त वीरेंद्र पाटील, बिपीन कदम, सनी धोत्रे, रघुनाथ नार्वेकर, रघुनाथ घोरपडे, टी. डी. पाटील, हुल्याळकर मामा, बी. ए. पाटील, अजय देशमुख महावीर पाटील राजेंद्र कांबळे अशोक सिंह रजपूत इरफान केडिया नितीन तावदारे अमोल कदम उत्तम सूर्यवंशी आयुब निशानदार मौला वंटमुरे, मोरे, ॲड. ए. ए. काझी, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त, समन्वयक, प्राचार्य सतीश पाटील, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.