| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ जानेवारी २०२५
साधारणपणे तीन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी काकांच्या हातातील घड्याळासह पक्षाचे नाव व चिन्ह घेऊन महायुतीत दाखल होऊन, मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घालून घेणे पसंत केले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित दादांना मतदारांनी धोबीपछाड दिला. राष्ट्रवादीच्या अवघ्या दोन खासदारांना दिल्लीत पाठवले. त्यामुळे अजितदादांच्या राजकीय भवितव्याची चिंता सर्वत्र व्यक्त होत होती.
मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भरारी घेतली व पुन्हा एकदा ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. इकडे महा आघाडीत शरद बाबूंच्या राष्ट्रवादीचे तीन तेरा वाजले. त्यांच्या आमदारांना कशीबशी दोन आकड्यापर्यंत मजल गाठता आली. त्यामुळे सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या बहुसंख्या आमदारांना दूर राहावे लागले.
मात्र आता शरद बाबूंच्या तुतारीचा आवाज अजित दादांच्या घड्याळाच्या टिकटिकीत सामाविण्याची चिन्हे दिसून येत आहेत. शरद पवार यांचे काही आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव आणत आहेत. मात्र याला अद्याप सुप्रियाताईंनी सहमती दर्शवली नाही. तर जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र याबाबतीत सोयीस्कर म्हणून पाळले असून, नुकत्याच संपन्न झालेल्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्याकरिता पोहोचलेल्या अजित पवारांशी ते जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत का ? अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर आठ व नऊ जानेवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा विषय ऐरणीवर येणार असून, त्यामध्ये काय निर्णय होतो ? शरद पवार व सुप्रियाताई कोणती भूमिका घेतात, आव्हाड आणि रोहित पाटील यांच्या विरोधाला न जुमानता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा होणार का ? यामध्ये काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ठाकरे शिवसेनेचे काय होणार ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण उद्धव ठाकरे यांचे काँग्रेसचे जमत नाही. त्यामुळे साहजिकच महाआघाडी फुटणार का ? आणि उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे जाणार का ? ही दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार ? अशी चर्चा आहे सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.