yuva MAharashtra जैन पाठशाळांना अनुदान, विहारधाम निर्माण करण्यासाठी जैन आर्थिक विकास महामंडळाला सहकार्य करू - ना. भरणे

जैन पाठशाळांना अनुदान, विहारधाम निर्माण करण्यासाठी जैन आर्थिक विकास महामंडळाला सहकार्य करू - ना. भरणे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जानेवारी २०२५
जैन धार्मिक ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना व जैन साधू साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहारधाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसऱ्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळातून राबवावयाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. व्यापार उद्योग, शेती, यासाठी कर्ज योजना, महिला बचत गट अर्थसाह्य, गृह कर्ज, विधवा पेन्शन या योजना एप्रिल 2025 पासून सुरू करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळाच्या योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले. 

जैन मंदिर, स्थानक, संघ या नोंदणी खूप संस्थान द्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात. अशा पाठशाला मध्ये जैन विद्यार्थी, महिला शिक्षण घेत असतात. त्यांना केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या प्राकृत व संस्कृत भाषेचे तसेच संगणक शिक्षक देण्यासाठी अनुदान देण्याचा, त्याचप्रमाणे पूर्णपणे पायी विहार करणाऱ्या जैन साधु साध्वींना त्यांच्या यात्रामार्गात सोय नसलेल्या ठिकाणी, विहारधाम निर्माण करताना ते प्राधान्याने सरकारी, निमसरकारी शाळांच्या क्षेत्रात उभारले जातील. त्यामुळे या सुविधांचा शाळांसाठीही उपयोग होईल असाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.


यावेळी बोलताना अल्पसंख्यांक मंत्रालयाचे प्रधान सचिव रुपेश जैवंशी यांनी महामंडळाच्या गतीशील कामकाजासाठी मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. शेवटी व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम यांनी आभार प्रदर्शन केले.

या बैठकीस अल्पसंख्यांक विभागाचे सचिव रुपेश जयवंशी, उपसचिव मो. बाबासाहेब. तहसीलदार, जय महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम, विशेष निमंत्रित संदीप भंडारी, जयेश ओसवाल, निरव देढीया यांच्यासह उपसचिव विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते.