| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्यांशी संवाद साधला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, पोलीस उपाधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, तसेच एकूण 84 महाविद्यालयाचे प्राध्यापक हजर होते. विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता, जनजागृतीचा अभाव, सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ, व वाहतूक नियमाबद्दल जागृतीचा अभाव याविषयी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते किंवा त्यामध्ये काय सुधारणा करता येतील या अनुषंगाने चर्चा झाली.
चर्चासत्रात निर्भया पथक, तक्रारी अवेअरनेस, रॅगिंग, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग, खाजगी क्लासेस चे नियम व अटी, अमली पदार्थांचे सेवन, दुष्परिणाम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित प्राचार्याने त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यांना येणाऱ्या अडचणी व संबंधित विषय याबाबत आपले विचार मांडले.
जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे सांगली यांनी चर्चासत्रात अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मनुष्य जीवनात व विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम त्यावरील उपाय योजना याबाबत मार्गदर्शन केले. वरील विषयाला अनुसरून शैक्षणिक संस्थांची जबाबदारी काय आहे ? अँटी रँकिंग कमिटी यांची कर्तव्ये, निर्भया पथकात समन्वय ठेवणे, लैंगिक अत्याचार तक्रारी, विशाखा समितीची कार्ये, कॉफी शॉप वरील कारवाई, स्कूल बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्कूल बस चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन, विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता व आवडी पदार्थांचे सेवन याबाबत काळजी आणि उपाय योजना, पोलीस प्रशासन व पालक यांची संयुक्त बैठक आयोजन, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्याला ओळखपत्र अनिवार्य करणे, महाविद्यालय कॅम्पस मध्ये अमली पदार्थांचे पान शॉप व टपऱ्यांना बंदी, तसेच मुलींचे अपहरण, बालविवाह आणि आत्महत्या या विषयावर संदीप घुगे, रितू खोकर यांनी सूचना पर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयात लावण्यासाठी ट्राफिक, अमली पदार्थ सेवन दुष्परिणाम व उपाय योजना याबाबतचे प्रबोधन पर पत्रके वाटप करण्यात आली. शेवटी रितू खोकर यांनी आभार मानले.