| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ जानेवारी २०२५
महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये पालकमंत्रीपदाच्या वाटपाचा विषय चिघळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा खुलासा समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात म्हणे शिवसेनेत "नवा उदय" करायचा प्लॅन होता, पण तो फसला, पण त्याच वेळी भाजपने "विजय" दारातच अडवला अशीही बातमी माध्यमातून समाजासमोर आली. भाजप महायुतीच्या महाविजयाने महाराष्ट्रातला राजकारणाचा चिखल वाळला नाही, तर तो अधिकच निसरडा बनला. महायुतीतल्या सगळ्याच घटक पक्षांना अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाल्याने त्यांच्या सत्तेच्या वाट्याच्या अपेक्षा वाढल्या. त्या पूर्ण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमछाक झाली. मुख्यमंत्री ठरवायला विलंब, मंत्रिमंडळ बनवायला विलंब, पालकमंत्री पद वाटपाला विलंब, असा विलंबित खल महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून झालेला राडा संपूर्ण राज्याने पाहिला. यानंतर मुख्यमंत्र्यांना या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या आदेशाला स्थगिती द्यावी लागली.
याच दरम्यान शिवसेनेतल्या "नव्या उदयाचा" प्लॅन फसल्याची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे नाराज झाल्यानंतर, भाजपने उदय सावंतांना हाताशी धरून शिवसेना फोडायचा प्लॅन आखला होता म्हणे. त्यांच्याबरोबर 20 आमदार फुटणार होते, पण एकनाथ शिंदे वेळीच सावध झाले म्हणून तो प्लॅन फसल्याने एकनाथ शिंदे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली. अशा शब्दांमध्ये विरोधकांनी मर्मावर बोट ठेवले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील उदय सामंतांच्याच दिशेने वाग्बाण सोडले.
पण अचानक उदय सामंत यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अशा पद्धतीने चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर समवेत दावोसला गेलेले सामंत "सावध" झाले. त्यांनी दावोस मधून खुलासा करून आपण आणि एकनाथ शिंदे एक असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे सर्वसामान्य घरातून पुढे आल्याने त्यांच्यात फूट पाडण्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप सामंत यांनी केला. विरोधकांचे वक्तव्य बालिश असल्याचे सांगून सामंतांनी ते झटकले. पण शिवसेनेचे 20 आमदार आपल्याबरोबर होते की नाही, याबद्दल त्यांनी कोणता खुलासा केला नाही.
परंतु विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल मात्र उदय सामंतांनी यावेळी वेगळाच गौप्यस्फोट केला. भाजपमध्ये येण्यासाठी विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटले, याची सगळी माहिती आपल्याकडे आहे. पण वैयक्तिक कोणाची बदनामी करण्यासाठी मी कधीच टीका करत नाही, असे उदय सामंत म्हणाले.
वास्तविक उदय सामंत यांच्या "उदया"ची बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच महाराष्ट्राच्या राजकीय तज्ञांच्या चर्चेत होती. महायुतीला बहुमत मिळाले नाही किंवा बरेच जुगाड करून सत्ता स्थापन करावी लागत असेल, तर "नवे नाव" म्हणून उदय सामंत यांचे नाव पुढे करायचे त्यावेळीच घाटत होते. तशा बातम्या कुठे ना कुठेतरी माध्यमांमधून समोर आल्या होत्या, पण त्यावेळी त्याचा कुणीच खुलासा केला नव्हता. त्यामुळे उदय सामंत हे शिवसेनेतून फुटणार नव्हते आणि ते एकनाथ शिंदे यांच्याशीच एकनिष्ठ होते, असे 100 % म्हणावे अशी वस्तुस्थिती नव्हती.
पण त्या पलीकडे जाऊन वडेट्टीवार यांचा "विजय" मात्र भाजपने दारातच अडवला हे राजकीय सत्य शिवसेनेतल्या फसलेल्या "नव्या उदयाच्या" निमित्ताने समोर आल्याने वडेट्टीवार यांच्या भोवती संशयाचे धुके निर्माण झाले !