| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २६ जानेवारी २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती हल्लीच खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीच्या स्थितीमुळे त्यांनी काही कार्यक्रम रद्द केले होते. शरद पवारांना खोकला आणि बोलण्यात अडचणीचा सामना करावा लागला, त्यामुळे एका जाहीर कार्यक्रमात ते भाषणही देऊ शकले नाहीत. त्यानंतर विश्रांती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी आज प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, शरद पवारांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात छातीत कफ होण्याची समस्या जाणवली होती, ज्यामुळे बोलताना त्यांना अडचण आली. त्यानंतर त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला गेला होता, परंतु त्यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमासाठी जाण्याचे ठरवले. कोल्हापूरच्या दौऱ्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडली, आणि त्यांनी मुंबईतील डॉक्टरांकडून विश्रांती घेण्याचा सल्ला घेतला.
शरद पवार यांच्या तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवत असून सध्या त्यांचे स्थिती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले आहे.