yuva MAharashtra वाढीव घरपट्टीतील पारदर्शीपणा सिद्ध होईपर्यंत बिले पाठवू नका : खा.विशाल पाटील

वाढीव घरपट्टीतील पारदर्शीपणा सिद्ध होईपर्यंत बिले पाठवू नका : खा.विशाल पाटील

फोटो सौजन्य  - दै. ललकार 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५

मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरुपात घरपट्टीतील वाढ मान्य केली जाणार नाही. आधी वाढीतील या पारदर्शीपणा पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या संयुक्त बैठकीत सिद्ध करावा. तोवर वाढीव घरपट्टीची बिले लोकांना पाठवू नयेत, अशी स्पष्ट सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज महापालिका आयुक्तांनी केली. मनपा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आढावा घेण्यासाठी आज खासदार पाटील यांनी बैठक घेतली. त्यात वाढीव घरपट्टीचा विषय केंद्रस्थानी होता. 

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोणत्याही स्वरुपात भुर्दंड लागता कामा नये. घरपट्टीच्या करात वाढ करताना तुम्ही लावलेल्या निकषाचे लोकांना आकलन झाले पाहिजे. अन्यायकारक घरपट्टीचे बील आले आहे, अशा लोकांच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारींचे योग्य पद्धतीने निरसन झाले पाहिजे. त्याआधी घेतलेला घरपट्टी वाढीचा निर्णय पारदशों आहे का, हे तपासावे लागेल. त्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसमोर त्याचा खुलासा करावा. तो योग्य वाटला तर पुढचा निर्णय घेता येईल. तोवर वाढीव स्वरुपाती बिले लोकांना देऊ नयेत. सक्तीने वसुली तर अजिबातच सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार पाटील यांनी दिला. 

आयुक्त शुभम गुप्ता यांनी त्यांची ही मागणी मान्य करत वाढीव बिले दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. सध्या ऑनलाईन पद्धतीने ज्या नोंदी केल्या जात आहेत, त्यात लोकांनी सहकार्य करावे. कर बुडवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. नियमित कर भरणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास यंत्रणेकडून होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


घरपट्टी वाढीचा निर्णय घेताना भाडेकरारावरील मातमत्तांबाबत वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत खासदार पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. हा विषय संवादातून सुटला पाहिजे. त्याबाबत योग्य धोरण ठरवा, असे त्यांनी सुचवले. मटण मार्केटच्या बांधकामात काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्याबाबत चर्चा करण्यात आली. या विषयात तातडीने तोडगा काढून काम सुरु करावे, अशी सूचना खासदार पाटील यांनी केली. उपायुक्त वैभव साबळे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.