yuva MAharashtra एसटीच्या भाडेवाढीवरुन महायुतीत वादाची ठिणगी, भाडेवाढ परस्पर जाहीर केल्याचा महायुतीतील नेत्यांचा आरोप !

एसटीच्या भाडेवाढीवरुन महायुतीत वादाची ठिणगी, भाडेवाढ परस्पर जाहीर केल्याचा महायुतीतील नेत्यांचा आरोप !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ जानेवारी २०२५

लाल परी... गरिबांचा प्रवासात. मात्र गेल्या काही वर्षात ही लाल परी अनेक समस्यांशी तोंड देत आहे. यामागे आर्थिक कारणासह इतरही अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित. याची तोंड मिळवणे करता करता एसटी महामंडळाचे अधिकारी, आणि पदाधिकारी यांच्या तोंडाला फेस येतो. मात्र मध्यंतरी नादुरुस्त बसेस, कोलमडलेले वेळापत्रक, चालक वाहकांची आरेरावी या आणि अशा अनेक कारणांनी, लाल परीचा आधारस्तंभ  प्रवासी यापासून दूर गेल्याचे चित्र दिसून येत होते.

यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अनुदानाची थैली महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना सवलत देण्याच्या माध्यमातून उघडली. मात्र तरीही लाल परीची चाके अर्थकारणाच्या दलदलीत रुतत चालली आहेत. आणि यावरील पर्याय म्हणून एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा तगादा गेल्या अनेक दिवसापासून शासनाकडे लावला होता.

मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ निर्णयाची फाईल लालफितीत बांधून ठेवण्यात आली होती. मात्र आता निवडणुका संपून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे ही भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्याने घेतला. परंतु हा निर्णय घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत घेतला, तसेच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, हा आरोप महायुतीतील नेत्यांकडून केला जात आहे.


त्याचप्रमाणे आता कुठे प्रवाशांची रेलचेल बस स्थानकावर दिसून येत आहे. एसटी बस मधून प्रवास करणारा प्रवासी हा सर्वसामान्य आहे, आधीच इतर अनेक वस्तूंचे भाव वाढलेले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशावेळी पुन्हा एकदा त्याच्या खिशावर भार टाकला तर तो प्रवाशांना रुचणार नाही. आणि याचा फटका आगामी निवडणुकावर होण्याची शक्यता असल्याने ही भाव वाढ करण्यात येऊ नये, असा महायुतीतील एका गटाचा आग्रह आहे. 

या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून एसटी भाडेवाढीवरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. एसटी भाडेवाढीवरून शिंदे गट आणि अजित पवार गटात दुमत दिसत आहे. एसटी बसेसची अवस्था ठीक नसताना भाडेवाढ करणे योग्य नसून अद्याप मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नाही. हा निर्णय अधिकाऱ्यानी परस्पर घेतल्याने प्रवाशात, नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत असल्याने, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.