| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. २८ जानेवारी २०२५
सांगली जिल्ह्यातील विटा एमआयडीसी परिसरात एक मोठा ड्रग्ज व्यवसाय उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) माऊली इंडस्ट्रीज नावाने सुरू असलेल्या एका तथाकथित केमिकल कंपनीवर छापा टाकून तब्बल 14 किलो एमडी ड्रग्जसह 15 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून, स्थानिक सराईत गुन्हेगार आणि मुंबईतील संपर्क या प्रकरणात समोर आले आहेत.
ड्रग्ज कारखान्यावर एलसीबीची मोठी कारवाई
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सांगली एलसीबीच्या पथकाने रात्री उशिरा माऊली इंडस्ट्रीजवर छापा टाकला. ही कंपनी केवळ केमिकल उत्पादनाचे आवरण दाखवत कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज तयार करत असल्याचे उघड झाले. छापेमारीदरम्यान, ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी रसायने, उपकरणे आणि मोठा साठा जप्त करण्यात आला.
अवैध व्यवसायाचा पर्दाफाश
प्राथमिक तपासात असे आढळले की, या कंपनीचे मालक आणि काही जणांनी केमिकल उद्योगाच्या नावाखाली बेकायदेशीर अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू केला होता. या कारवाईत मुख्य संशयितासह काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्ह्यात खळबळ; पोलिसांची मोठी कामगिरी
एमडी ड्रग्ज हा एक धोकादायक अंमली पदार्थ असून, त्याचा गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो. या प्रकरणामुळे विटा परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. स्थानिक गुन्हेगाराच्या या प्रकरणातील सहभागामुळे संशयाची साखळी वाढली आहे. सांगली पोलिसांनी घेतलेली ही धाडसी कारवाई अमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी एक महत्वाचे पाऊल ठरत आहे.
सांगली पोलिसांच्या या यशाबद्दल लवकरच अधिकृत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.