yuva MAharashtra पंढरपूर येथील गर्दीचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार !

पंढरपूर येथील गर्दीचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी 

| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. २१ जानेवारी २०२५

अवघ्या विश्वाची माऊली असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत भाविकांची नेहमीच मोठी गर्दी होत असते. वर्षातील आषाढी व कार्तिकी यात्रा दरम्यान लाखो भाविक महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून येथे येत असतात. तसेच चैत्र व माघ या अन्य दोन यात्राही वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. या चारयात्रांसह दररोज भाविकांची विठू माऊलीच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लावली जाते. वर्षभरात जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त भाविक पंढरपुरात येत असतात.

भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पंढरपूरसाठी कॅरीडोर निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असतानाच या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आता ए आय तंत्रज्ञानाचाही वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी संगणक प्रणाली करिता शासनाकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली. सोलापूरचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरे हे, ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.


पंढरपूर मध्ये आषाढी व कार्तिकीसह चार मोठ्या यात्रा भरत असतात याशिवाय लहान-मोठे सण, लागून येणाऱ्या सुट्ट्या अगदी महिन्याच्या एकादशीलाही दोन ते तीन लाख भाविक विठू माऊलीच्या दर्शनासाठी दूरवरून येत असतात. आषाढी आणि कार्तिकी महासोळ्यासाठी प्रतिवर्षी पंधरा ते वीस लाख भाविक पंढरपूर मध्ये दर्शनासाठी दाखल होत असतात. 

भाविकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेले पंढरपूर वाढत्या गर्दीमुळे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात लाखो भाविकांची मांदियाळी असते. या गर्दीमुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. आरोग्य विषयक समस्या ही मोठे असते.


या सर्वांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता ही आहे तंत्रज्ञानाचा वापर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात येणार आहे. भाविकांना चंद्रभागेचे सुरक्षित स्नान करता यावे, विठू माऊलीचे मनोभावे दर्शन घेता यावे. वे कोठेही अनुचित प्रकार घडू नये. याकरिता यात्रेदरम्यान प्रशासन डोळ्यात तेल घालून दक्ष असते. या जोडीला आता तंत्रज्ञान येणार असल्यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे.

मंदिराकडे येणारी गर्दी, दर्शन रांगेत उभे राहिलेले भाविक, पंढरपूर मध्ये फिरणारे पर्यटक या सर्वांचे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियोजन केले जाणार आहे. यासाठी सॅटॅलाइट, इंटरनेट, जीपीएस सिस्टीम, व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही आणि मानवी व्यवस्थापन अशा सर्वच माध्यमातून एकत्रीकरण केले जाणार आहे. याचा भविष्यात पंढरीत येणाऱ्या भाविकांना चांगला फायदा होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले यांनी दिली आहे.