yuva MAharashtra तो पत्रकार होता हाच त्याचा गुन्हा होता !

तो पत्रकार होता हाच त्याचा गुन्हा होता !


| सांगली समाचार वृत्त |
बिजापूर - दि. ५ जानेवारी २०२५
तो पत्रकार होता हाच त्याचा पहिला गुन्हा होता..
अन, तो त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होता हा त्याचा दुसरा मोठा गुन्हा होता. पण निर्दयपणे त्याचा जीव घ्यावा एवढा मोठा गुन्हा होता का हा? नक्कीच नाहीच...

पण असं झालं आहे.
छत्तीसगड मधील बिजापूर येथील
पत्रकार मुकेश चंद्राकार याची काल अत्यंत अमानूषपणे, अगदी आपल्या सरपंच देशमुख पध्दतीनं हत्या केली गेली...

बातमी हे कारण.. 
बातमी देणं हेच तर मुकेशचं काम होतं, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणं, अन्यायाच्या विरोधात आवाज देणं मुकेशचं कर्तव्य होतं. तो हेच तर करीत होता...

एका महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता..त्यामुळं तो रस्ता चार महिन्यात फुटला होता. त्याची बातमी मुकेशनं दिली. किती गंभीर गुन्हा होता हा नाही ? 

बातमीची छत्तीसगड सरकारनं दखल घेतली, चौकशी सुरू झाली.. त्यामुळे ठेकेदाराचे हितसंबंध दुखावले.. चवताळलेल्या गुत्तेदारानं मग त्याला माझी बाजूही दाखवा असं सांगून घरी बोलावलं.. गुत्तेदाराच्या गुंडांनी मग त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. तीक्ष्ण हत्याराने त्याच्या मानेवर, डोक्यावर, छातीवर वार केले गेले. त्यात मुकेश ठार झाला. मग त्याचा मृतदेह घरातील सेप्टीक टँकमध्ये टाकला गेला. त्यावर सिमेंटचे मोठे झाकण ठेवले गेले...


दोन दिवस मुकेशचा पत्ता नाही म्हटल्यावर शोधाशोध सुरू झाली. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन गुत्तेदाराच्या घरातले दाखवत होते. अखेर मुकेशचा मृतदेह गुत्तेदाराच्या घरातील सेप्टीक टँकमध्ये मिळाला...

ही बातमी बस्तर, बिजापूर ते सुकमा या दंडकारण्य परिसरात पोहोचली. पत्रकार रस्त्यावर आले. माध्यम जगतात मोठा संताप आहे. मुकेश चंद्राकार हा एनडीटीव्हीसाठी काम करायचा. त्या अगोदर त्यानं इटीव्ही, न्यूज 18 छत्तीसगड साठी काम केलं होतं. "बस्तर जक्शन" नावाचं स्वता:चं युट्यूब चँनल तो चालवायचा. एक दबदबा असलेला मोठा पत्रकार होता तो...

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुकेशनं शिक्षण घेतलं, कधी आश्रमशाळेत, कधी वसतीगृहात राहून त्यानं शिक्षण पूर्ण केलं. हलाखीचं आयुष्य वाट्याला आल्यानं गरिबी, गरिबांच्या व्यथा, आदिवासींचे प्रश्न मुकेशला ज्ञात होते. त्या प्रश्नांबद्दल त्याला तळमळ होती...

संघर्षशील आयुष्य वाट्याला आल्यानं एक बेडरपणा स्वभावात आला होता, त्यामुळे माओवाद्यांच्या कॅम्पमध्ये घुसून ते कँम्प आपल्या युट्यूब दाखविण्याची हिंमत मुकेश करू शकत होता. मुकेशला लोकमान्यता मिळाली होती..
दुसरीकडं त्याचे शत्रूही निर्माण झाले होते. अखेर शत्रूंनी डाव साधला आणि एका लोकप्रिय, सामान्यांसाठी लढणाऱ्या पत्रकाराचा आवाज कायमचा बंद केला गेला...

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,
आणि डिजिटल मिडिया परिषद या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे...

छत्तीसगड सरकारने या हत्याकांडाची गंभीर दखल घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारने देखील या घटनेची दखल घेऊन देशभर पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी आमची मागणी आहे...

एस. एम. देशमुख
विश्वस्त, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद.

( सोबतची छायाचित्रं आमचे गडचिरोली येथील पत्रकार मित्र महेश तिवारी यांच्या सौजन्याने)