yuva MAharashtra शिवाजी मंडई व राम मंदिर चौकात निरपराध नागरिकाचा बळी, आता प्रशासन झुलेलाल चौकातील बळीच्या प्रतीक्षेत आहे का ?

शिवाजी मंडई व राम मंदिर चौकात निरपराध नागरिकाचा बळी, आता प्रशासन झुलेलाल चौकातील बळीच्या प्रतीक्षेत आहे का ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जानेवारी २०२५

साधारणतः तीन-चार महिन्यापूर्वी सांगलीतील शिवाजी मंडई परिसरातील अतिक्रमणामुळे एका निरपराध नागरिकाचा बळी गेला. तर महिनाभरापूर्वी सांगलीतील राम मंदिर चौकात आणखी एक बळी याच बेजबाबदार वाहतूक व्यवस्थेमुळे गेला. आता  झुलेलाल चौकातील फळ विक्रेते, चहा व खाद्य टपरी यांचे अतिक्रमण आणि मुजोर वडाप रिक्षा चालकांनी व्यापलेल्या रस्त्यामुळे आणखी एका निरपराधाचा बळी जाण्याची प्रतिक्षा महापालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस विभाग करीत आहे की काय ? अशी शंका नागरिकांतून व्यक्त होत आहे.

सांगली शहरातील झुलेलाल चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. कोल्हापूर कडून येणारी वाहने, मिरजेकडून कोल्हापूरकडे व शहरात येणारी वाहने यांची मोठी गर्दी असते. अशातच मध्यवर्ती बस स्थानक नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने, उत्तरेकडील बस ये-जा करणारे दोन्ही गेट बंद आहेत. परिणामी बस स्थानकाच्या पूर्वेकडील झुलेलाल चौकातील गेटमधून बसेस बाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. 


परिणामी हा चौक आता अत्यंत धोकादायक बनला आहे तो, येथील फळ विक्रेते व रिक्षा चालकांच्या अस्ताव्यस्त उभे करण्यामुळे. या रिक्षा उभे राहण्यामुळे जवळजवळ निम्म्याहून अधिक चौक व्यापलेला असतो. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसना व शहरात येणाऱ्या किंवा कोल्हापूर कडून येणाऱ्या वाहनांना अवघा सात ते आठ फुटाचाच रस्ता शिल्लक राहतो. यातूनच प्रवाशांना व पादचाऱ्यांना तसेच दुचाकीधारकांना मार्ग काढावा लागतो. यामध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असतो.

या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे या ठिकाणी कधी, केव्हा, कोणाचा बळी जाईल याची शाश्वती उरलेली नाही. सांगली महापालिकेचा सुस्त अतिक्रमण विभाग आणि केवळ दंड वसुलीत व्यग्र असलेला वाहतूक पोलीस विभाग यांना याची कोणतीच गंभीरता नाही. शिवाजी मंडई परिसर व राम मंदिर चौकातील दोन बळी नंतर पुन्हा आणखी एक बळी या विभागाला हवा आहे का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.