yuva MAharashtra सहकारी संस्थांचे निवडणुकीचे बिगुल वाजणार; यंदा नवीन वर्षात जिल्ह्यातील ४०५ संस्थात नवे संचालक ?

सहकारी संस्थांचे निवडणुकीचे बिगुल वाजणार; यंदा नवीन वर्षात जिल्ह्यातील ४०५ संस्थात नवे संचालक ?

फोटो सौजन्य  : गुगल स्रोत

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जानेवारी २०२५
विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत स्थगिती दिली होती. ही मुदत संपल्याने ६ जानेवारी २०२५ पासून सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. यंदा जिल्ह्यातील ४०५ सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार असून साखर कारखाने, विकास सोसायट्यांचा समावेश आहे.राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया विधानसभा निवडणुकीमुळे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. 

त्यानुसार निवडणूक प्राधिकरणानेही निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांची निवडणूक, तसेच निवडणुकीसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पात्र ठरणाऱ्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्या टप्प्यावर स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. यातून २५० हून कमी सभासद असणाऱ्या व हौसिंग सोसायट्यांच्या निवडणुकांना वगळण्यात आले होते.


स्थगितीची ३१ डिसेंबरची मुदत संपल्याने व शासनाने स्थगितीबाबत पुढील आदेश न दिल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या होत्या, तेथून पुढे, तसेच नव्याने मुदत संपलेल्या व संपत आलेल्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत.

सोमवारपासून ही प्रक्रिया सुरु हाणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये जिल्ह्यातील ४०५ संस्थांचा समावेश आहे. यात 'अ' वर्गातील तीन, 'ब' वर्गातील ३८ व 'क' वर्गातील ३६५ संस्था आहेत.

वसंतदादा, सर्वोदय, सोनी कारखाना निवडणूक

'अ' वर्गतील तीन संस्थांमध्ये वसंतदादा, सर्वोदय साखर व सोनी (ता. मिरज) येथील शेतकरी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यातील वसंतदादा व सर्वोदय साखर कारखान्यांची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. या कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया महिन्यात सुरू होणार आहे. प्रारूप मतदार यादी, नंतर अंतिम मतदार यादी व त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन मार्चमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.