yuva MAharashtra राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, चालकासह ३५ जण जखमी, सुदैवाने जीवित हानी नाही !

राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, चालकासह ३५ जण जखमी, सुदैवाने जीवित हानी नाही !

फोटो सौजन्य - दै. लोकमत 

| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. २८ जानेवारी २०२५

एकीकडे जुन्या व कालबाह्य एसटी बसेसमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असतानाच, दुसरीकडे बस चालकांमुळे अपघाताची मालिका राज्यात कुठे न कुठेतरी सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक सुविधा पूर्ण व सुरक्षित प्रवाशाची अपेक्षा करीत असतानाच प्रवाशांच्या माथी भाडेवाढीवरुन नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काल पुणे-बेंगळुरू महामार्गावरील तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे सोमवारी (दि. २७) सकाळी एका एसटी बसला भीषण अपघात झाला. पुलावरून सुमारे २५ फूट खोल ओढ्यात बस कोसळल्याने ३५ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी आणि कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे.

काय घडले ?

दहिवडी आगारातून सुटलेली दहिवडी-जोतिबा मार्गावरची एसटी बस (MH ३४ BT ४२०३) जोतिबाच्या दिशेने जात होती. तांदुळवाडी जवळील एका पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट ओढ्यात कोसळली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून इतर ३५ प्रवासी किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या जखमांनी त्रस्त झाले आहेत.

पोलीस आणि बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच कुरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी विक्रम पाटील आणि सुनील माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित बचावकार्य हाती घेत प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही बचत कार्यात सहकार्य केले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताची चौकशी सुरू असून प्रवाशांची संख्याही तपासली जात आहे.

मोठा धोका टळला !

अपघातस्थळी ओढ्यातून वारणा नदीच्या पाण्यासाठी मोठे पाईप टाकण्यात आले आहेत. मात्र, अपघाताच्या वेळी वीजपुरवठा खंडित असल्याने पाईपमधील पाणी बंद होते. अन्यथा, पाईप फुटल्यामुळे ओढ्यात पाण्याचा साठा झाला असता आणि बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला असता.