yuva MAharashtra रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी !

रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ जानेवारी २०२५
मंत्रिमंडळामध्ये डावलेले गेलेले भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत एका पत्राद्वारे चव्हाण यांची निवड केली. 

विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्र यांना फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे भाजपच्या एक व्यक्ती एक पद या निर्णयानुसार यांच्या ऐवजी रवींद्र चव्हाण यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळेल अशी चर्चा मध्यंतरी होत होती. मात्र रवींद्र चव्हाण यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नेमले गेल्यामुळे आता अध्यक्षपदाचे जबाबदारी कोणावर ? हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद राहू द्यावे, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. काही दिवसापूर्वीच प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यांच्याकडे भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

2022 मध्ये मंत्रीपदी वर्णी लागण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. ते मंत्री होताच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र 15 डिसेंबर रोजी मंत्री झालेल्या बावनकुळे यांच्या जागी नियुक्ती पक्षाने केलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलले गेले, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, याची चर्चा पक्षांतर्गत होत होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.


चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे तर बावनकुळे हे ओबीसी समाजाचे आहेत. त्यांच्यावर मंत्रिमंडळातील चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मराठा कार्यकारी अध्यक्ष बनवुन भाजपाने साधण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

शिर्डी येथे आजपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने रवींद्र चव्हाण यांना दिलेली नवीन जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. सध्या राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण झाली असून, या दोन्ही नेत्यांच्या निवडीतून मराठा व ओबीसी समाजाला सांभाळण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला आहे. आता ही दोन्ही नेते समाजातील ही तेढ कशी दूर करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.