| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जानेवारी २०२५
पाणी हे जीवनाचा स्रोत असले तरी तेच पाणी दूषित झाल्यास आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाच्या परिणामांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने सांगलीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात समाज प्रबोधन सप्ताहांतर्गत "सूक्ष्मजीवांमुळे होणारे जलप्रदूषणः खबरदारी व उपाययोजना" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
जलप्रदूषणाची कारणे व परिणाम
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी. बी. बल्लाळ यांनी सूक्ष्मजीवांमुळे पाणी दूषित कसे होते, यासंबंधी सविस्तर माहिती दिली. पाण्यात जीवाणू आणि विषाणूंचा प्रवेश प्रामुख्याने मलमूत्र, जैविक कचरा, शेतीतील रसायने आणि औद्योगिक सांडपाणी यामुळे होतो. दूषित पाण्यामुळे विषमज्वर, काविळ, आमांश, कॉलरा यांसारखे आजार होऊ शकतात.
जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, पाण्याच्या पाइपलाइनची योग्य देखभाल आणि शुद्धिकरण प्रक्रिया आवश्यक आहे. तसेच, जैविक आणि औद्योगिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे.
ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी जलप्रदूषणाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले आणि नागरिकांसाठी मोफत पाणी तपासणी सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थ श्री. भिसे यांनी या व्याख्यानासंदर्भात समाधान व्यक्त करत अशा जनजागृतीपर उपक्रमांचे बाळूमामा मंदिर परिसरात आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडला.
कार्यक्रमाचे आयोजन आणि सहभाग
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले. प्रा. ए. ए. मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एम. जे. धनवडे यांनी आभार मानले. याप्रसंगी शामराव पाटील, पांडुरंग सावंत, दिनकर पवार, चंद्रकांत पवार, विजय पाटील, आलम मुजावर, अर्जुन चौगुले, विलास कोळी, श्रीधर पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.