| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ९ जानेवारी २०२५
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीस शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याची माहिती हे हत्या प्रकरण धसास लावणारे आमदार सुरेश धस यांनी प्रसार माध्यमाना दिली. धनंजय देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसमवेत आ. धस यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह भेट घेतली. यानंतर आ. धस यांनी प्रसार माध्यमांशी सारखं साधून ही माहिती दिली.
संतोष देशमुख यांच्या मुलांचे शिक्षण सुरू असल्याने त्यांच्या पत्नीला शासकीय विभागात सामावून घेतले जाईल. त्यांची नियुक्ती कोणत्याही शाखेत झाली तरी, पोस्टिंग लातूर जिल्ह्यातच करण्याची विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यालाही मान्यता दिल्याचे आ. धस म्हणाले.
याबाबत अधिक माहिती देताना आ. धस म्हणाले की, तपास कामात दिरंगाई होत असल्याने एस आय टी मध्ये बदल करण्याची विनंती ही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून, तसे आदेश तात्काळ दिले आहेत पुढील दोन दिवसात एसआयटीमध्येही बदल झालेला दिसेल, असे सांगून आ. धस पुढे म्हणाले की, परभणीतील घटने वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेले आंबेडकर नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांनाही मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. त्यांच्या मुलालाही शासकीय सेवेत शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे आ. धस यांनी सांगितले.