| सांगली समाचार वृत्त |
बोरगाव - दि. २८ जानेवारी २०२५
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या अथक परिश्रमातून वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, स्वयंसेवा, नेतृत्व प्रशिक्षण, आरोग्य व क्रीडा शिबीरे, शाळा, पाठशाळा या उपक्रमांतून वीर सेवा दल संघटना मजबूत झाली. गेल्या ४५ वर्षात वीर सेवा दलाने भरीव कामगिरी केली आहे. आता यापुढे जैन समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केले. वीर सेवा दलाचा ४६ वा वर्धापन दिन, शिष्यवृत्ती फंड देणगीदार सन्मान व शाखा नोंदणी मध्ये उच्चांकी सदस्य नोंदणी करणाऱ्या शाखांचा चेतना सन्मान सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील होते.
यावेळी बोलताना प्रा. एन. डी. बिरनाळे पुढे म्हणाले की, दक्षिण भारत जैन सभेने १९२२ पासून जैन समाजातील युवक संघटीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु चार युवक संघटना अल्पायुषी ठरल्या. प्राचार्य जी. के. पाटील यांनी युवा शक्ती संघटनेचे महत्त्व सांगणारा अग्रलेख प्रगती जिनविजय मध्ये लिहिला. तो डॉ. धनंजय गुंडे यांनी वाचला आणि जैन सेवा दलाची संकल्पना स्पष्ट करणारा लेख लिहून दक्षिण भारत जैन सभेच्या दावणगिरी अधिवेशनात युवक संघटना स्थापनेचा ठराव मांडला आणि डॉ. एन. जे. पाटील यांनी अनुमोदन दिले.
गावोगावी १५ दिवसात एकदा वीर सेवा दलाची शाखा मंदीरात भरली पाहिले. वीर सेवा दलाच्या सैनिकांनी दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचा इतिहास, तीर्थंकर व शांतीसागर आणि वीराचार्य चरित्रे वाचली पाहिजेत. हातात हात घालून एकीने वाटचाल केले पाहिजे. असे ही प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी सांगितले.
प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले, 'इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत.आजच्या सारख्या कोणत्याही सुविधा नसताना ४५ वर्षापूर्वी वीर सेवा दलाच्या जडणघडणीत अनेकांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची नोंद घ्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन विजेता व्हा. गावागावातील मंदीर कमिटीशी संवाद ठेवा. जैन समाजाच्या प्रश्नांना भिडा.. महिला, बालक व युवा वर्गाला मदत करा.दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे यांच्या सारखे बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे जैन नेते तयार झाले पाहिजे. प्रथमाचार्य शांतीसागर ते विद्यासागर बहुतेक मोठे साधू, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल, यांचा जन्म कर्नाटकातील आहे. गोमटेश भगवान आणि ताडपत्रीवरील आगम ग्रंथ मुडबिद्री म्हणजे कर्नाटकातील आहे. सभेला मोठे केलेले रावसाहेब दादा आणि वीर सेवा दलाचे अध्वर्यू डॉ. धनंजय गुंडे बोरगावचे म्हणजे कर्नाटकातील.. कर्नाटक तुझे सलाम!
अध्यक्षीय भाषणात भालचंद्र पाटील म्हणाले, 'वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्यात नैतिकता, नितीमत्ता होती. सेवाभाव होता. 'पुन्हा वीराचार्य होणे नाही, कर्जे काढून सवाल धरणे, पंचकल्याणक पूजेवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा मर्यादेत खर्च करुन तो पैसा शिक्षणासाठी द्या. संस्था आणि समाज सक्षम करा.. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांना अपेक्षित काम करा. जैन उद्योजकांकडून सीएसआर फंडातून मदत घेऊन पाठशाळांना इन्वर्टर पॅनेल बसवणार आहे. युवकांशी संवाद साधून समाज एकत्र करुया. संस्कार, शिक्षण व आरोग्यासाठी धन खर्च झाले पाहिजे. यासाठी दक्षिण भारत जैन सभेला ताकद देण्यासाठी सभासद संख्या वाढली पाहिजे.१० हजार सभासद वाढीचा संकल्प केला आहे. प्रगतीचे वर्गणीदार वाढले पाहिजेत. पुण्यात सभासद वाढीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तेथे सभेचे विभागीय कार्यालय व वसतिगृह काढण्यात येणार आहे.जैन समाजातील मुलांचे शिक्षण व त्यांना नोकऱ्या देणे हा खरा ज्वलंत प्रश्न आहे. मुंबईत संवाद मेळावा घेणार आहे. स्व. रावसाहेब दादांनी मोठे काम केले आहे. आता त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती मिनाक्षी वहिनी, पुत्र उत्तम व अभिनंदन यांचे सभेला चांगली मदत होते आहे.'
सुभाष मगदूम यांनी स्वागत केले तर अजित भंडे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब पाटील, रावसाहेब जि. पाटील,अनिल बागणे, अरविंद मजलेकर व श्रीमती मिनाक्षी रावसाहेब पाटील यांची वीर सेवा दल कार्यगौरव आणि या युवा संघटनेला कायम मदत करण्यासाठी कटीबध्द असल्याची भाषणे झाली.
दक्षिण भारत जैन सभेचे माजी अध्यक्ष श्रावकरत्न स्व. रावसाहेब दादा पाटील यांची प्रतिमा असलेल्या सन २०२५ च्या कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जैन समाजाच्या गरीब मुलांना भरघोस शिष्यवृत्ती देणाऱ्या जीवनमंगल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली व शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, इंचलकरंजी यांचा सत्कार करण्यात आला. हे सत्कार सुनिल पाटील व अनिल बागणे यांनी स्विकारले.
सन २०२५ सालासाठी उच्चांकी सदस्य नोंदणी केलेल्या वीर सेवा दल शाखा बेडकीहाळ,शाखा माणगाव व शाखा इचलकरंजी जैन बोर्डिंग यांचा सत्कार करण्यात आला. आभार संयोजक आनंद उगारे यांनी मानले. पौर्णिमा प्रदीप दानोळे व रोजे सर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या उत्तम तयारीसाठी सहकार्य श्रीमती मिनाक्षी वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे ट्रस्टी अभिनंदन पाटील, अरिहंत परिवाराचे युवा नेते उत्तम पाटील, विनयश्री व धनश्री पाटील यांनी केले होते.
या कार्यक्रमाला दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, सहखजिनदार अरविंद मजलेकर, डॉ. चंद्रकांत चौगुले, अँड जयंत नवले, प्रा. डी. ए. पाटील, सागर चौगुले, शशिकांत राजोबा, भूपाल गिरमल, प्रकाश दानोळे, अनिल ठिकणे, सुकुमार बेळके, डॉ. रावसो कुन्नुरे, पुरंदर कनवाडे, आर बी खोत सर तिन्ही पतसंस्थांचे मॅनेंजर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक वीराचार्य आयटीआयचे प्राचार्य या शाखांमधुन उपस्थित सर्व परीवार सदस्य व दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सदस्य, वीराचार्य सांगली, कर्मवीर जयसिंगपूर, शांतीसागर शिरगुप्पी पतसंस्था संचालक व सेवक, कार्यकर्ते, बोरगाव व परिसरातील जैन श्रावक, श्राविका आणि वीर सैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.