| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जानेवारी २०२५
राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS)च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे आणि सोलापूरमध्ये या सिंड्रोमचे रुग्ण आढळल्यानंतर आता सांगलीतदेखील या आजाराचा शिरकाव झाला आहे. सांगलीतील चिंतामणीनगर, मर्दवाडी आणि गुडमूडशिंगी येथे तीन रुग्ण सापडले आहेत. या तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रशासनाची सर्तकता आणि सर्वेक्षण
सांगलीतील आरोग्य यंत्रणा सर्तक झाली असून, शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोमचे सर्वेक्षण सुरू केले आहे. हा आजार शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला मज्जासंस्थेवर हल्ला करण्यासाठी ओळखला जातो, ज्यामुळे बधीरपणा, स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे आणि अचानक हाता-पायांची ताकद कमी होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
पुण्यातील स्थिती स्थिर, पण मृत्यूचा धक्का
सध्या पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १११ वर स्थिर आहे. पुण्यातील रुग्णालयात यावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची स्थिती सुधारली आहे. मात्र, पुणे विभागात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हटले आहे आरोग्य अधिकाऱ्यांनी ?
सध्या जी.बी.एस. आजाराच्या रुग्णांची पुणे शहरांमध्ये संख्येत वाढ होत असून, सोलापूर, सांगली, कोल्हापूर शहरांमध्ये ही जी.बी.एस. आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या आजाराबाबत योग्य माहिती, खबरदारी व काळजी घेऊन, पुढे दिलेली काही या आजाराची लक्षणे जाणवल्यास वेळेत उपचार केल्यास या आजाराचा धोका संभवणार नाही. याकरिता घाबरून न जाता खबरदारी घेण्याबाबतचे आवाहन सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या आजाराची लक्षणे:-
शरीराच्या खालच्या भागात पाय तळपाय यामध्ये मुंग्या येणे व त्याची तीव्रता हळूहळू शरीराच्या वरच्या भागात वाढत जाते.
अशक्तपणा, चेहऱ्याचे स्नायु लुळे पडणे, गिळताना त्रास उद्भवतो, बोलताना त्रास उद्भवणे,
शरिराची सर्व स्नायू दुखणे, रुग्णाच्या शरिराची सर्व हालचाल कमी होते,
श्वसनास त्रास होतो,
नागरिकांनी घ्यावयाची काळजी :-
पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ पाणी गाळून घेणे,
अन्नस्वच्छ आणि ताजे आहारात घ्यावे,
वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा,
शिजलेले आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यास ही संसर्ग टाळता येऊ शकतो,
श्वसनाचे आजार होऊ नये याकरीता नागरिकांनी काळजी घेणे (मास्क वापरणे)
हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे,
नागरिकांनी घाबरून न जाता महापालिकेच्या जवळील दवाखाने / प्राथमिक आरोग्य केंद्र /आयुष्मान आरोग्य मंदीर अथवा शासकीय रुग्णालय यांच्याकडे ताबडतोब जाऊन उपचार घ्यावेत. घरच्या घरी उपचार करु नयेत.
- डॉ. वैभव पाटील
वैद्यकीय आरोग्याधिकारी
सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका