yuva MAharashtra पत्रकार होण्यासाठी मुळात जिज्ञासू वृत्ती हवी, माती आणि माणसांशी नाळ जोडलेली हवी - ज्येष्ठ पत्रकार नंदू गुरव

पत्रकार होण्यासाठी मुळात जिज्ञासू वृत्ती हवी, माती आणि माणसांशी नाळ जोडलेली हवी - ज्येष्ठ पत्रकार नंदू गुरव


| सांगली समाचार वृत्त |
कडेपूर - दि. ११ जानेवारी २०२५
पत्रकार होण्यासाठी मुळात जिज्ञासू वृत्ती हवी. आपली माती आणि माणसांशी नाळ जोडलेली हवी. सतत नाविन्यपूर्ण शोधून ते समाजासमोर मांडण्याची धडपड हवी. बातमी लेखन हे एक कौशल्य असून त्यासाठी खूप अवांतर वाचन व लेखन मांडणीचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार नंदू गुरव यांनी व्यक्त केले.

आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे पत्रकार दिनानिमित्त मराठी विभाग व माजी विद्यार्थी पत्रकार सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पत्रकारिता संधी आणि आव्हाने' या विषयावरील कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एल.जी. जाधव हे होते.


कार्यशाळेचे उद्घाटन निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवप्रसाद यादव यांनी केले. पत्रकारितेसाठी अभ्यासू वृत्ती आवश्यक असल्याचे सांगून पत्रकारांनी कोणत्याही गोष्टीमागील वास्तव निर्भीडपणे समाजासमोर आणणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी जीवन चव्हाण, राजेश महाडिक, सचिन मोहिते, अमोल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून या कार्यशाळेमागील उद्देश स्पष्ट केला. 

कार्यशाळेचे समन्वयक, प्रा.डॉ. स्वप्निल बुचडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अनिता आंबोकर यांनी केले तर प्रा. डी. ए. होनमाने यांनी आभार मानले.