| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जानेवारी २०२५
मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने मराठा समाज संस्था, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्रांचे प्रदर्शन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी सांगलीच्या मराठा समाज भवनात आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील जुनी आणि दुर्मिळ वृत्तपत्रे, सांगली जिल्ह्यातील दुर्मिळ वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुलकर्णी यांनी संग्रह केला आहे. आर. आर. पाटील ज्ञान प्रबोधिनीने या संग्रहाचे वृत्तपत्र प्रदर्शन निर्माण केले असून पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिवंगत ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते गजानन साळुंखे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पत्रकार दिनाचे औचित्य साधून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उद्घाटन तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मराठा समाज संस्थेचे नूतन अध्यक्ष संभाजीराव पाटील सावर्डेकर, उपाध्यक्ष डॉ. मोहनराव पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर यांचा जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया संघाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
बऱ्याच वर्षानंतर सांगली जिल्ह्यात वृत्तपत्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. जिज्ञासूं बरोबरच शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी, कार्याध्यक्ष बलराज पवार, सरचिटणीस प्रवीण शिंदे, परिषद प्रतिनिधी जालिंदर हुलवान, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे, कार्याध्यक्ष अभिजीत शिंदे सरचिटणीस मोहन राजमाने आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.