निसर्गरम्य परिसरात मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन कार्यक्रम संपन्न !
सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १७ जानेवारी २०२५
पत्रकार म्हणून काम करीत असताना निर्भीडपणे अन्यायाविरुद्ध उभे रहावे, पण पत्रकारांनी तत्त्वनिष्ठही बनावे असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी केले. मराठी पत्रकार परिषद संलग्न मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे आयोजित दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मोहन वनखंडे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री. शिवराज काटकर यांनी भूषविले होते.
यावेळी बोलताना प्रा. मोहन वनखंडे म्हणाले की, शहरी पत्रकारांपेक्षा ग्रामीण पत्रकारांच्या समोर अनेक आव्हाने असतात. ही आव्हाने पार करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु पत्रकारांनी निर्भीडपणे या साऱ्यावर मात करीत समाजातील अन्यायावर प्रहार करावा. मात्र हे करीत असताना, त्यांनी तत्वनिष्ठही बनायला हवे, असे सांगून प्रा. मोहन वनखंडे यांनी समाजकारण व राजकारण करीत असताना आलेले अनुभव कथन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. शिवराज काटकर म्हणाले की, पत्रकार ग्रामीण असो वा शहरी, प्रामाणिकपणे पत्रकारिते काम करीत असताना हल्ले होत असतात. अशावेळी समाजाने पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. यावेळी श्री. काटकर यांनी मार्गदर्शनपर भाषणात बोलताना मराठी पत्रकार परिषदेतर्फे भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
भविष्यात पत्रकारांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या स्वमालकीचे प्लॉट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. शिवराज काटकर म्हणाले की, शहरी असो वा ग्रामीण, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी लवकरच मोफत आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देण्यात येतील. पत्रकारांना अधिस्विकृती कार्ड बरोबरच, ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न असेल.
यावेळी मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये आरग येथील गुरुप्रसाद महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आरसगोंडा व कार्यकारी संचालक प्रथमेश आरसगोंडा, श्री. अनिल शिंदे, श्री. मारुती जमादार , सलगरे च्या सरपंच जयश्री तानाजी पाटील, डॉ.. नितीन चिकुर्डेकर, श्री. दीपक शिंदे, बेडग येथील गणराज कला व क्रीडा मंडळाचे सदस्य, आदींचा समावेश आहे.
यावेळी श्री. शिवराज काटकर यांची राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला.
सुरुवातील उपस्थित आमचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बाळासाहेब कणसे यांनी केले. तर सूत्रसंचालन पत्रकार श्री. युवराज जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर हे खास करून उपस्थित होते. त्याचप्रमाणे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.