| सांगली समाचार वृत्त |
पणजी - दि. १९ जानेवारी २०२५
मैदानी खेळामध्ये जशी आव्हाने, साहस, प्रतिस्पर्ध्याला 'टसल' देऊन विजय एक वेगळाच आनंद देऊन जातो. अनेक खेळाडू या मैदानी खेळामधून आनंद मिळवत असतानाच पॅराग्लायडिंग या साहसी खेळाचाही आनंद घेत असतात.
पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळ (Adventure Sport) आहे. या खेळात खेळाडू पॅराशूटसारख्या उपकरणाचा (पॅराग्लायडर) वापर करून उंच टेकडी किंवा डोंगरावरून हवेत झेप घेतात आणि जमिनीवर लँडिंग करतात.
पॅराग्लायडिंगचे मुख्य वैशिष्ट्ये:
1. साहस: हा खेळ साहसी आव्हाने स्वीकारणाऱ्यांसाठी आहे.
2. प्राकृतिक सौंदर्य अनुभवणे: उंच हवेतून जमिनीवरची दृश्ये अनुभवता येतात.
3. तांत्रिक कौशल्य: खेळाडूला हवेचा प्रवाह आणि दिशा ओळखण्याची कला हवी असते.
4. सुरक्षितता उपकरणे: हेल्मेट, हार्नेस, आणि आपत्कालीन पॅराशूटसारख्या गोष्टींचा वापर केला जातो.
लोकप्रिय ठिकाणे:
भारतामध्ये हिमाचल प्रदेश (बिर बिलिंग), उत्तराखंड, महाराष्ट्रातील पंढरपूर व कुसुर यांसारख्या ठिकाणी पॅराग्लायडिंग लोकप्रिय आहे.
हा खेळ रोमांचक असला तरी तो प्रशिक्षित व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच करणे सुरक्षित ठरते, अन्यथा आपल्या जीवास गमवावे लागते. गोव्यातील केरी (पेडणे) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर पॅराग्लायडिंग व्यवसायिकामुळे पुण्यातील एका तरुणीच्या आयुष्याची दोरी तुटली ती पॅराग्लाइडिंगची दोरी तुटल्यामुळे...
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील काही पर्यटक पॅराग्लाइडिंग करण्यासाठी कॅरी पर्वतावरील व्यावसायिकाकडे गेले होते. त्यावेळी पॅराग्लायडरची दोरी तुटल्यामुळे शिवानी दाभळे (वय 26) आणि पॅराग्लायडिंग चा पायलट सुमन नेपाळी (वय 25) हे दोघेही उंचावरून थेट दरीत कोसळले आणि यातच या दोघांचाही अंत झाला की दुर्घटना काल शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत मांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
शिवानी ही मित्रांसोबत गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आली होती. पर्यटनाचा एक भाग म्हणून ही सारी मंडळी केरी (पेडणे) येथील शेखर रायजादा या पॅराग्लायडिंगच्या व्यावसायिकाकडे गेली. शिवानी दाभळे ही, पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी याच्यासोबत पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लाइडरची दोरी तुटली, आणि दोघेही उंचावरून दरीत कोसळले.
या परिसरात काही बेकायदा पॅराग्लायडर व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर पॅराग्लाइडर व्यवसायिकांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केली आहे. यापूर्वी या डोंगर पठारावर कित्येक पर्यटक आपला जीव गमावून बसले आहेत तर काहीजण जायबंदी हे झाले आहेत, अशी माहितीही आ. आरोलकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.