सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जानेवारी २०२५
पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावाने रचनात्मक उपक्रम राबविणारी लतिका गांधी फौंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. संस्था रक्तदान व आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून व शाळांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचे आरोग्य संवर्धक कार्य करते ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. असे गौरव उद्गार सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काढले. लतिका गांधी फौंडेशन, सांगली यांच्या सौजन्याने स्व. उज्वलाताई अभय शाह (कागलकर) यांच्या स्मरणार्थ शिशु विकास मंडळ, सांगली संचलित डॉ. देशपांडे बालविद्यामंदिर, सांगली येथे पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट व उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले की, सांगलीसाठी शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे. शहरातील सर्वांना आपल्या हक्काचे शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात. सांगलीचे विद्यार्थी व नागरिक या गंभीर समस्येंनी चिंतीत असताना लतिका गांधी फौंडेशनने सांगलीत शाळेतील मुलांसाठी वाॅटर फिल्टर भेट देऊन मानवतावादी रचनात्मक उपक्रम राबविला आहे. रक्तदान व आरोग्य शिबीरे आयोजित करुन, फौंडेशन सांगलीचे आरोग्य जपण्याचा सतत प्रयत्न करत असते. याबद्दल फौंडेशन कौतुकास पात्र आहे. असे उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले.
पृथ्वीराज पुढे म्हणाले, 'डॉ. लताताई देशपांडे आणि डॉ. विजयकुमार शहा हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचे काम करत आहेत. शिशु विकास मंडळाचे डॉ. देशपांडे बालविद्यामंदीर ही गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा सांगलीचे वैभव आहे.'
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. लताताई देशपांडे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, लतिका फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. कबीर मगदूम, श्री. विजयदादा कडणे, श्री. अशोक थोरातसर, श्री.शहानवाज फकीर, श्री.अमोल गवळी, श्री.ज्ञानेश्वर वाघ, श्री.साहिल मगदूम, श्री.अझरुद्दीन बेग, श्री. सत्यजित कराडकर, प्राध्यापिका सौ.वैशाली शिंदे तसेच डॉ. देशपांडे बालविद्यामंदिरचे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.