yuva MAharashtra बॉम्ब आहे... मदत पाहिजे... एक कॉल... पोलिसांची धावाधाव, तपासाअंती सत्य आलं बाहेर; अन् घडले ते सारं अस्सं !

बॉम्ब आहे... मदत पाहिजे... एक कॉल... पोलिसांची धावाधाव, तपासाअंती सत्य आलं बाहेर; अन् घडले ते सारं अस्सं !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जानेवारी २०२५
अपघात असो, चोरी असो, गुंडांकडून मारहाण असो, किंवा मग गाव गुंडांकडून मुलींची छेडछाड... अडचणीत सापडलेल्यांना तात्काळ पोलिसांचे मदत मिळावी म्हणून, 112 क्रमांक 24 तास कार्यान्वित असतो. आजवर अनेकांना या क्रमांकाचा फायदा झाला आहे. या क्रमांकावर फोन आल्यानंतर पोलीस संबंधितांना सहाय्य करण्यासाठी तात्काळ धाव घेत असतात...

परंतु कधी कधी क्रमांकावर फोन करून पोलिसांना नाहक त्रास दिला जातो, पोलिसांचे धावपळ होते. पण वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर, सारेच रिलॅक्स होतात... असाच प्रकार काल 112 क्रमांक वर आलेल्या निनावी कॉल मुळे घडला... सांगली कंट्रोल रुममध्ये बॉम्ब ठेवला आहे, पोलिस मदत हवी आहे.' कॉल येताच पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिस अधिक्षक कार्यालय, नियंत्रण कक्षासह बसस्थानकात बॉम्बशोधक पथकाने तपासणी मोहीम सुरू केली.


शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता 112 नंबरवर सांगली पोलिस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब ठेवला आहे, पोलिस मदत हवी आहे' अशी अर्धवट माहिती देणारा कॉल आला. हा कॉल शहर पोलिस ठाण्याकडे डायल 112 वर कार्यरत पोलिस कर्मचारी वसिम मुलाणी यांना ट्रान्सफर झाला. त्यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ तपासणीचे आदेश दिले. बॉम्बशोधक पथकानेही तातडीने पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे तपासणी केली. पण कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे खोटा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. आणि साऱ्यांनीच निश्वास सोडला...


पण हा कॉल खोटा असल्याचे समोर आले. दरम्यान मोबाईल लोकेशनवरून तपास करीत पोलिसांनी खोटा कॉल करणाऱ्या संशयिताला बेड्या ठोकल्या. यमनाप्पा मरगप्पा माडर (वय 50, रा. तवटे मळा, मालगाव, ता. मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याने दारुच्या नशेत कॉल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कॉल करणार्‍याचा शोध सुरू झाला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. एलसीबीचे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने मालगाव (ता. मिरज) येथून कॉल करणार्‍या यमनाप्पा माडर याला ताब्यात घेतले. त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे कबुल केले. यांना पा माडर याने यापूर्वी 2023 मध्ये ही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात असाच दारूच्या नशेत कॉल केला होता. त्यावेळीही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.


दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी कोणीही अशा प्रकारे खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.