| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जानेवारी २०२५
स्व. गुलाबराव पाटील हे निष्णात कायदेपंडीत होते. गरीबांचा वकील अशी त्यांची ख्याती होती. सांगलीच्या सम्राट व्यायाम मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाली आणि सांगलीचे नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, उपाध्यक्ष व शेवटी १४ वर्षे अध्यक्ष, कृष्णा खोरे दूध उत्पादक संघ, जिल्हा नियोजन मंडळाचे सेक्रेटरी, संजय गांधी निराधार योजनेचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी संघाचे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष, राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून म्हणून त्यांचे उठावदार व भरीव कार्य महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहिली आहे.
त्यांच्या या विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण भरीव कामगिरीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार व वंचित आणि शेवटचा माणूस स्वाभिमानी व स्वावलंबी झाला हे त्यांचे सार्वजनिक क्षेत्रातील अखंड ४० वर्षाच्या लोकसेवेच्या तपश्चर्येचे महाराष्ट्र व सांगली जिल्ह्यातील लोकांवर न फिटणारे उपकार आहेत.
सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचे नेतृत्व करत स्वतःसाठी व पुत्र शिवराज आणि पृथ्वीराज यांच्यासाठी त्यांनी एकही संस्था काढली नाही. इतरांप्रमाणे वारसदारांची सोय केली नाही. मात्र त्यांनी स्वतःच्या बळावर राजकारणात जायचे असेल तर खुशाल जा.. गोल्ड, गैंग आणि गॉडफादर विना स्वकर्तृत्वावर लोकसेवा करा असा सल्ला पृथ्वीराज पाटील यांना दिला. तळ्यात राहून पाणी प्यायचं नाही. वैभवात राहून स्वतः काही भोगायचं नाही. सत्तेत राहून त्यातून वैयक्तिक हित साधायचं नाही, करायचं ते इतरांसाठी. पदाचा वापर जनहितासाठी करणारा, सत्ता, संपत्ती व प्रसिध्दीचा यत्किंचितही हव्यास नसलेला, लाल दिव्याच्या गाडीपेक्षा एसटीचा प्रवास मला परवडतो, मानवतो, असे परखडपणे सांगणारा, मुख्यमंत्री पदाची आलेली संधी अनपेक्षितपणे हुकल्यानंतर राज्यमंत्री पद नाकारुन तेजस्वी स्वाभिमानी बाणा जपलेले माझे आबा हे महात्मा गांधी यांचे सच्चे अनुयायी वाटतात असे सार्थ वर्णन कर्तबगार पुत्र पृथ्वीराजबाबा पाटील यांनी 'सहकारतीर्थ या ग्रंथाच्या मनोगतात केले आहे.
अंतीम समयी नाममात्र बँक बॅलन्स असलेल्या गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेचा बँक बॅलन्स वाढविण्यासाठी सहकार चळवळ मजबूत केली. म्हणून सामान्य माणसाला अच्छे दिन निश्चित आले हे वास्तव आहे. गुलाबराव पाटील यांनी वारसदारासाठी आर्थिक व भौतिक संपत्तीचे पाठबळ ठेवले नाही. परंतु चांगला माणूस होण्यासाठी, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करुन व्यापक जनकल्याणासाठी संस्था उभा करण्याची प्रेरणा, नीती मूल्यांचे संस्कार मुला-बाळांना जरुर दिले आहेत.
वडील गुलाबराव पाटील यांचे जिवंत स्मारक म्हणून त्यांच्या भरीव कार्याचा वारसा पुढे नेटाने चालवण्यासाठी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय पृथ्वीराजबाबा पाटील यांनी कोणतेही पाठबळ नसताना घेतला. मिरजेतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेऊन हजारो डॉक्टर्स, परिचारिका, प्राध्यापक, शिक्षक व क्लास वन अधिकारी स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगत आहेत. शिक्षणसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सांगलीकर जनतेची सेवा या माध्यमातून पृथ्वीराजबाबा पाटील यांनी गुलाबराव पाटील यांची खरी स्मृती जपली आहे एवढे मात्र निश्चित..!
गुलाबराव प्रभावी वक्ता होते. राज्यभर दौरे करुन त्यांनी निकोप व निदर्दोष सहकार चळवळीचा प्रचार केला. बैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, यशवंत चव्हाण, विखे-पाटील , वसंतदादा, राजारामबापू पाटील, इत्यादी सहकार क्षेत्रातील नेत्यांमध्ये गुलाबराव पाटील यांचा समावेश होतो.
अमेरीका, जपान, इंग्लंड, इस्रायल, कोरिया, इराण, कुवेत, तुर्कस्तान व अफगाणिस्तानच्या सहकार चळवळीचा अभ्यास दौरा करुन त्यांनी 'सहकाराची नवी दिशा' हा लिहिलेला ग्रंथ सहकार क्षेत्राला दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार व बंचित मेंढपाळ, डवरी, गोसावी व गोंधळी लोकांना शेती व व्यवसायासाठी कर्जे दिली वेळेत कर्ज परत फेडणाऱ्यांना रिबेट दिले. आज सांगली जिल्ह्यातील जो ग्रामीण विकास दिसतो त्याची पाळेमुळे गुलाबराव पाटील यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व सहकारातील राज्यस्तरीय नेतृत्वात आहेत. त्यांनी सहकारी संस्थांचा कारभार निर्दोष, सभासद व संस्था हिताचा आणि स्वच्छ व पारदर्शक राहिला पाहिजे यासाठी संचालक व नोकरांसाठी सहकार प्रशिक्षण संस्था सुरु केली. कृषी राजकारण बहुजन समाजातील लेकरांचे उच्च शिक्षण करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एक लाख रुपयांची देणगी त्यांनी दिली होती.
सहकारी संस्थेतील गैरव्यवहार व गैरव्यवस्थापन यामुळे अनेकसंस्था दिवाळखोरीत गेल्या. त्यामुळे सभासदांचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी सहकार क्षेत्रातील संस्थांचा कारभार चांगल्या माणसाच्या हाती राहिला पाहिजे. सहकारात गैरव्यवहार व गैरव्यवस्थापन असता कामा नये. अपप्रवृत्तीची माणसे असता कामा नयेत.. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी सहकाराचा वापर होता कामा नये, संस्थेत नुसतेच ठराव नकोत.. त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली पाहिजे, जनरल समेत खुली चर्चा करा. सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, आर्थिक शिस्त व पारदर्शकता हवी, दुर्बल व वंचित घटक सहकाराच्या प्रवाहात सामील करा. ग्रामीण भागाचा सहकारातून योजनाबद्ध विकास करा, हे गुलाबराव पाटील यांचे विचार सहकार क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते यांनी तंतोतंत पाळले तर कोणतीच सहकारी संस्था बुडणार नाही तर ती प्रगतीपथावरच राहिल. म्हणून आज सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांनी गुलाचराव पाटील पॅटर्न राबवणे हेच त्यांच्या स्मृतीस खरे अभिवादन ठरेल. स्व. गुलाबराव पाटील यांच्या ३६ व्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
- प्रा. एन. डी. बिरनाळे,
कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
(शिक्षक सेल)