yuva MAharashtra महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू, मौनी अमावस्यानिमित्त स्नानावेळीची दुर्घटना !

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू, मौनी अमावस्यानिमित्त स्नानावेळीची दुर्घटना !

फोटो सौजन्य  - gittiimage  

| सांगली समाचार वृत्त |
प्रयागराज - दि. ३० जानेवारी २०२५

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी मौनी अमावस्यानिमित्त शाही स्नान घालण्यात येत होते. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली. प्रारंभी या घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती, पण नंतर अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे या दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाला असून ९० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना, ज्यामध्ये बॅरिकेड्स तोडले गेल्यामुळे गर्दीच्या प्रचंड दाबामुळे लोक एकमेकांवर चिरडले गेले, ती अत्यंत क्लेशदायक होती. असे सांगून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ३० जणांपैकी २५ मृतदेहांची ओळख पटवली आहे, तर पाच मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रशासनाने मदत कार्य सुरु केल्यानंतर रुग्णवाहिकांच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.


याच वेळी, महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रयागराजशी जोडलेल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमांना सील केले आहे. यामुळे प्रयागराजमध्ये येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ताज्या घटनेनुसार, प्रशासन आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी मदतकार्य करत असून, अतिरिक्त सुरक्षेसाठी सर्व सीमांना सील केले गेले आहे.