| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जानेवारी २०२५
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो ने अंतराळात बियाणे उगवण्याचा अविष्कार केला आहे. प्रतिकूल परिस्थितीत वनस्पतींच्या वाढीची प्रक्रिया समजून घेणे, हा या प्रयोगाचा उद्देश आहे. यातून मिळालेल्या निष्कर्षाच्या आधारे भविष्यातील रणनीती आखली जाईल, असे इस्त्रोने म्हटले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळात आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत चार दिवसांत अंतराळयान प्लॅटफॉर्मवर बिया उगवण्यात इस्रोला यश आले आहे. इस्रोने सोमवारी एक्स वर पोस्ट करत बियांमधून पाने बाहेर येत असल्याचे सांगितले. काऊसीडचे बीज (चवळीचे बीयाणे) हे लेबियांच्या बियासारखे दिसत आहे. या बीजात भरपूर पोषक तत्व असतात.
२४ विविध प्रकारचे प्रयोग : या प्रयोगासाठी कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज अंतर्गत एकूण आठ बिया अवकाशात पाठवण्यात आल्या होत्या. विक्रम साराभाई स्पेस सेंटरनं ही चाचणी केली आहे. ३० डिसेंबर रोजी दोन उपग्रह अवकाशात सोडले होते. या दरम्यान रॉकेटच्या चौथ्या टप्प्यातील प्लॅटफॉर्म ३५० किमी उंचीवर पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे, जिथं २४ विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत.
दरम्यान इस्रोच्या या नव्या प्रयोगाने भारताने एक नवे संशोधनात्मक पाऊल टाकले असून, भविष्यात अंतराळातील कामगिरी बाबतचे हे कौतुकास्पद कार्य देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या कामगिरी बाबत अभिनंदन केले आहे.