yuva MAharashtra ४७ वर्षानंतरही मैत्रीत भावनेचा ओलावा कायम ठेवलेला "आरवाडेयिन्स ग्रुप" !

४७ वर्षानंतरही मैत्रीत भावनेचा ओलावा कायम ठेवलेला "आरवाडेयिन्स ग्रुप" !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जानेवारी २०२५

सुकलेली पाऊल सावरणारे हात...
हरलेल्या मनाला उभारी देणारे शब्द...
अडखळत चालणाऱ्या पावलांमध्ये ताकत देणारे शब्द 
नि जगण्याचा उत्सव बनवणारा प्रत्येक क्षण...
हे सार आढळतं, एका निखळ आणि निर्मळ मैत्रीत... मैत्री म्हणजे काय ? मैत्री म्हणजे दोन अंतःकरणांचा अबोल संवाद. जिथे शब्दांत नव्हे तर भावनांमध्ये अर्थ शोधला जातो... कारण मैत्रीची ओळख असते ती निखळ भावनेत. जी कोणत्याही अपेक्षाच्या चौकटीत अडकत नाही... जिला ना वयाचे बंधन असते, ना 'स्त्री पुरुष'च्या लेबलचे...

आज हे सार आठवण्याचं कारण म्हणजे, ४७ वर्षानंतरही मैत्रीत हाच भावनेचा ओलावा कायम ठेवलेला "आरवाडेयिन्स ग्रुप" !

सांगलीतील सर्वसामान्यांची ओळख बनलेल्या आरवाडे हायस्कूल मधील, अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत जी मंडळी एकत्र वाढली, खेळली, अगदी भांडलीही... प्रसंगी अबोलाही धरला... पण तो होता क्षणिक... त्यामध्ये राग होता पण सूड भावना नव्हती, आणि म्हणूनच तो अखंड टिकला...

दहावीनंतर या मित्रांची पुढील शिक्षणाची दारे शोधण्यासाठी पांगापांग झाली... यातून जी मंडळी आरवाडे हायस्कूल मधून उच्च शिक्षणासाठी पुन्हा एकत्र आली, त्यांच्यात मैत्रीचा हा ओलावा अजूनच वाढला... परंतु या दरम्यान काही मित्र अन्य महाविद्यालयात दाखल झाली... महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने नव्या प्रवाहात सामील झाली... पण या प्रवाहातही ही मैत्री टिकली होती. 'प्रसंगानुरूप बाहेरगावी गेलेली मंडळी काही ना काही कारणांनी एकत्र आल्यानंतर तो ओलावा मैत्रीतील जिव्हाळा वाढविण्यास कारणीभूत ठरत असे...


साधारण तीन वर्षांपूर्वी आरवाडे हायस्कूलने 1978-79 च्या विद्यार्थ्यांसाठी 'गेट टू गेदर'चा कार्यक्रम आयोजित केला होता... यावेळी नियमित भेटणाऱ्या मित्रमंडळींबरोबरच, या निमित्ताने एकत्र आलेले मित्रही होते... आठवणींना उजाळा मिळाला... दिवस अत्यंत आनंदात गेला... आणि याच वेळी एक कल्पना साकारले यापुढे दरवर्षी एकत्र यायचे... त्यानुसार गेले तीन वर्षे ही मंडळी नववर्षाच्या सुरुवातीस एकत्र येतात... यामध्ये  वर्ग भगिनीही सहभागी असतात... गतवर्षभरातील यदा कदाचित आलेले दुःख किंवा कटू प्रसंग विसरण्यासाठी हा जमलेला मित्रमंडळीचा समूह औषधाचे काम करतो... तर या दरम्यान अनुभवलेले अनुभवाचे बोल या मित्रमंडळीत दिले जातात...

गत सप्ताहात ही मंडळी हरिपूर रोडवरील प्राची लॉन येथे एकत्र आली... आनंदाचे क्षण दिले घेतले गेले... यावेळी आरोग्यमित्र चिंतामणी बोडस यांनी सांगली ते अयोध्या या सायकल यात्रेचा अनुभव कथन केला. हे अनुभव ऐकताना मित्रांच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. तदनंतर विद्याधर धर्माधिकारी यांनी पुढील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा कथन केली. दिवसभराच्या आनंदमयी क्षणानंतर हरिपूरच्या संगमावर मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून संध्याकाळी आपापल्या घरट्याकडे परतताना या मंडळींनी पुन्हा पुढील वर्षी पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प केला...


या साऱ्या कार्यक्रमाचे नियोजन, मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक मोहिते, विजय मुळे यांनी... अभय जोशी, दीपक बाणकर, प्रमोद यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले... सहाजिकच सर्वांनी या दोघांचे मनःपूर्वक कौतुक केले...

खरंच मित्रांनो... मैत्री असावी तर अशी... 

जीने के लिए दोस्ती वजह बन जाये ।
हर गम में भी खुशियों की राह दिखाये ।...

ज्यांच्या आयुष्यात खरी मैत्री आणि मित्र आहेत, त्यांच्याजवळ एक अविनाशी संपत्ती आहे. जी कधीच संपत नाही उलट वेळेनुरूप ती अधिक खोल आणि गहरी बनत जाते. जगाच्या कोलाहालात जरी हरवून गेले कुणी, तरी मैत्रीतली एक हाक परत स्वतःजवळ आणते...

आरवाडेयिन ग्रुप मधील मित्रांसाठी...