| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव आणि हॉटेल शिलेदार फोडून साहित्य चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छडा लावला. संशयित समशुद्दीन महंमद इलियास खान (वय २७, रा. मोमीननगर, पेठवडगाव), महंमद इम्रान अकबर अली (वय २४, रा. पेठवडगाव, मूळ रा. मैना, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), फर्याद आलम महंमद इलियास खान (वय २३, रा. पिपरा पठाण, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मालवाहतूक टेम्पो व हॉटेलमधून चोरलेले साहित्य असा ३ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक माहिती अशी, कसबे डिग्रज येथे सहा दिवसांपूर्वी हॉटेल वैभव फोडून आतील साहित्य लंपास केल्याचा प्रकार घडला होता. तसेच दहा दिवसांपूर्वी हॉटेल शिलेदार येथूनही साहित्य लंपास केले होते. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकास दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास सूचना दिल्या होत्या. पथकातील कर्मचारी दरिबा बंडगर, अनिल कोळेकर, विक्रम खोत यांना कुपवाड एमआयडीसीमध्ये काळ्या रंगाचा मुंबई पासिंग टेम्पो संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सावळी येथे आरटीओ ऑफिसजवळ हा टेम्पो अडवला. टेम्पोच्या हौद्यात मोठ्या गोण्या बांधलेल्या आणि पत्र्याचे तुकडे दिसले. चालक समशुद्दीन खान याची झडती घेतल्यानंतर खिशात रोकड मिळाली. केबिनमध्ये बाजूला बसलेल्या फर्याद खान याच्यासमोरील सॅक उघडून पाहिली. आतमध्ये कटावणी, पक्कड, मारतूल, हॅक्सा ब्लेड मिळाले. हौद्यात भांडी, इलेक्ट्रिक फ्रीज, एसी, मोठी पातेली, ग्राईंडर, हॉटकेस मिळाली नाही. पोलिसांनी तिघांची चौकशी केल्यानंतर कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव, हॉटेल शिलेदारमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. टेम्पो व साहित्य असा ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना मुद्देमालासह सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
भाड्याच्या खोलीत राहून चोरी
समशुद्दीन हा मूळचा मुंबईतील मानखुर्द, शिवाजीनगर येथील आहे. पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे तो भाड्याने खोली घेऊन राहत होता. महंमद व फर्याद हे साथीदारही त्याच्यासोबत होते. दोन हॉटेल फोडून त्यातील साहित्य विक्री करत असताना ते पकडले गेले.
गुन्हे अन्वेषणकडील महादेव नागणे, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, संदीप नलवडे, सूरज थोरात, सांगली ग्रामीणचे मेघराज रूपनर, अभिजित पाटील, बंडू पवार, सायबर ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली.