| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ जानेवारी २०२५
पत्रकारांच्या सुरक्षितेच्या मुद्यावर लोकसभेत चर्चा घडवून आणू अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना दिली. सांगली शहर पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते.
यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे, महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जेष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, राष्ट्रवादीचे नेते प्रा. पद्माकर जगदाळे, सांगली शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष खराडे आदी उपस्थित होते. सुरुवातीला जेश पत्रकार स्व. आण्णा कोरे यांच्या निधनानिमित आदरांजली वाहून साध्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, राज्यसभेत २५ ते ३० टके खासदार हे कधी ना कधी पत्रकार म्हणून कार्यरत होते असे दिसून आले. आज पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर हल्ले होतात, यासाठी आपण लोकसभेत स्वतंत्र विधेयक मांडणार आहे. यासाठी आधी पत्रकाराची व्याख्या निश्चित करणे गरजेचे आहे. आजच्या पत्रकारीतेला दोनशे वर्षाचा झंझावाती इतिहास आहे. त्या काळात पत्रकारांच्या समस्या आहेत, त्याच आजही आहेत. काळ बदलला असल्याने त्याचे स्वरुप बदलले असेल कदाचित, पत्रकारांच्या समस्या सोडवण्यात आपण राजकारणी कमी पडलो आहोत. माझ्या पाच वर्षाच्या कार्यकालात पत्रकारांच्या कल्याणासाठी नवनवीन योजना राबवू, मानसिक, शारिरीक आरोग्य कसे उत्तम राहिल यासाठी प्रयत्न करु. लोकसभेत पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन खासदार. विशाल पाटील यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे म्हणाल्या, आजच्या पत्रकारितेपुढे नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. ब्रेकिंग न्यूजचे प्रेशर आमच्या पत्रकारांसमोर आहे. माहितीचा स्फोट मोठा होतो आहे, यात माहितीची विश्वासार्हता जपणे आवश्यक आहे. समाजातील सर्व घटकांचे सामाजिक स्वास्थ जपण्याचे कर्तव्यही आपल्या लेखणीतून पत्रकार करतात.
जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पुगे म्हणाले, माध्यमे कितीही बदलली तरी प्रिंट मिडियाचे महत्व कमी होणार नाही. सकाळी सकाळी सर्व क्षेत्रातील फ्रेश बातम्या वाचायला मिळतात. हा फ्रेशपणा जपला पाहिजे.
आयुक्त शुभम गुमा यांनी आजच्या काळात पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. समाजातील प्रश्नांचा अभ्यास करुन त्याची मांडणी केली तर बाबर उत्तर मिळते. असे मत मांडले, आमदार इद्रिस नायकवडी यांनी पत्रकारांसाठी सुरक्षित कायदा आवश्यक आहे, हक आमदार म्हणून तुमचे प्रश्न शासनापर्यंत मांडू, शासनाकडून पत्रकारितेची व्याख्यान निश्चित करायला हवी. उगाच भाऊगर्दी नको, असे स्पष्ट मत मांडले.
प्रा. पद्माकर जगदाळे यांनी पत्रकारीतेपुढे एजआयचे तंत्रज्ञानाचे संकट असले तरी याचा निर्माता माणूसच आहे हे विसरुन चालणार नाही.
सुत्रसंचालन हरिष यमगर यांनी केले, आभार सुभाष खराडे यांनी मानले. यावेळी विविध वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते.