| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जानेवारी २०२५
आप्पासाहेब बिरनाळे व वसंतदादा यांच्यातील मैत्रीने सांगली जिल्ह्याच्या विकासात योगदान दिले आहे. अशीच मैत्री बबनराव बिरनाळे व प्रकाशबापूंनी जोपासली व आम्ही तिसरी पिढी ही ती जपत आहोत, असे प्रतिपादन खा. विशाल पाटील यांनी येथे बोलताना केले. सांगलीचे दिवंगत आमदार स्व. आप्पासाहेब बिरनाळे यांच्या सुशोभीत पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले. त्यावेळी अध्यक्षपदावरून खा. पाटील बोलत होते.
खासदार पाटील पुढे म्हणाले, वसंतदादा व आप्पासाहेब यांनी मन लावून काम केले. आप्पासाहेबांच्या काळात जिल्हा परिषदेमध्ये झालेले निर्णय आताही क्रांतिकारक मानले जातात. त्यामुळेच ४० वर्षानंतरही त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तचा योग या दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीकडून घडून येत आहे.
प्रारंभी शिराळ्याचे आ. सत्यजित देशमुख यांच्या हस्ते वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वंध्यत्व निवारण बाह्य रुग्ण विभाग आणि एआरटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्ट शैक्षणिक संकुलामध्ये सुशोभित करण्यात आलेल्या ट्रस्टचे संस्थापक आप्पासाहेब बिरनाळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोहनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष समीर बिरनाळे यांनी सर्वांचे स्वागत केले.
ट्रस्टचे मार्गदर्शक बबनराव बिरनाळे यांनी आपल्या मनोगतात वसंतदादांच्या व प्रकाश बापूंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आप्पासाहेबांनंतर वसंतदादांनी सर्व ज्येष्ठ मंडळी असतानाही आपल्यावर ट्रस्टची जबाबदारी सोपवून कामाची संधी दिली. त्यांनी दिलेल्या या संधीमुळे संस्था वाढवता आली व सर्व संस्था स्वयंभू करता आल्या. तिसऱ्या पिढीने हे गठबंधन असेच वाढवावे अशी अपेक्षा श्री. बिरनाळे यांनी यावेळी व्यक्त केली.
पुतळा सुशोभीकरण करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचललेले आप्पासाहेब बिरनाळे आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अरुंधती वाटेगावे, इंजिनिअर शितल कवठेकर, दीपक खोलकुंबे, तानाजी कदम यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना, विशाल पाटील यांनी दादांचा आदर्श घेऊन कार्यकत्यांना आमदार-खासदार करावे, यावेळी जरी चुकले असले तरी भविष्यात मदत करावी असे आवाहन विशाल पाटील यांना केले. आपल्या शैक्षणिक नोकरीची सुरुवात या ट्रस्टच्या महाविद्यालयातूनच झाले असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
आ. सत्यजीत देशमुख यांनी वसंतदादा, शिवाजीराव देशमुख, पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. बबनराव बिरनाळे यांच्या जिल्हा परिषदेतील कामाचाही त्यांनी गौरव केला. ट्रस्टने उभारलेल्या सर्वच शाखांचा सुसंगत आणि अद्ययावत अशा शब्दात त्यांनी गौरव केला. माजी आमदार नितीन शिंदे यांचेही यावेळी भाषण झाले.
मिरजेचे आ. डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी बोलताना जिल्ह्याची शोभा वाढवणारे संस्थेला आपले नेहमी सहकार्य राहील, अशा संस्थांचा आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी बोलताना केले.
दरम्यान, या सुशोभित पुतळ्याचे नियोजित उद्घाटक आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे मुख्य कार्यक्रमाच्या अगोदर येऊन ट्रस्टच्या सभागृहात आप्पासाहेब बिरनाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ट्रस्टचे संचालक सागर बिरनाळे यांनी ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या संस्थांची माहिती दिली. आप्पासाहेबांच्या सहृदयी, कर्तृत्ववान नेतृत्वाने उभारलेल्या या संस्थांना भारती विद्यापीठाचा नेहमीच पाठिंबा राहील असे डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले शेवटी सागर बिरनाळे यांनी आभार मानले..
कार्यक्रमास श्री वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे संचालक, ट्रस्टच्या सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आप्पासाहेब बिरनाळे सहकारी बँक, पतसंस्था, इंडिया गारमेंट चे संचालक, कर्मचारी, विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंबालन केले.