yuva MAharashtra सांगलीतील बाल गुन्हेगारी रोखण्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर आव्हान !

सांगलीतील बाल गुन्हेगारी रोखण्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर आव्हान !

फोटो सौजन्य  - चॅट जीटीपी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जानेवारी २०२५

एकीकडे गुन्ह्यातील पोलीस आरोपींच्या मुस्क्या आवळत असतानाच दुसरीकडे, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडणे, चोरीच्या घटनेत वाढ, गुन्ह्यात बालगुन्हेगारांचे वाढते प्रमाण, रात्रीच्या वेळी लेडी डॉन टोळीची आणि चौघा . इसमांचा सांगली शहरात वाढता वावर, अशा घटना घडताना दिसून येत आहेत.

त्यामुळे केवळ मोठ्याच नव्हे तर बाल गुन्हेगारांनाही पोलिसांचा व कायद्याचा धाक राहिला आहे की नाही ? अशी परिस्थिती सांगली महापालिका क्षेत्रात दिसून येत आहे. यापूर्वी महापालिका क्षेत्रात गुन्हे घडत नव्हते असे नाही, परंतु अलीकडील गुन्ह्यात नशेखोरी, खून, मारामारी अशा घटनांमध्ये बाल गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंता निर्माण करणारे आहे. शांत, सांस्कृतिक, शैक्षणिक उच्च परंपरा असलेल्या सांगलीची प्रतिमा डागाळते आहे.


सांगलीचे कर्तव्यदक्ष पोलीस प्रमुख संदीप  घुगे आणि त्यांच्या टीमने कर्तव्यात कसूर केली आहे, असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. परंतु तरीही वाढते गुन्हे, त्यातील तरुणांचे व अल्पवयीन मुलांचे वाढते प्रमाण. यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत चालली आहे. आणि म्हणूनच या भावी पिढीला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर उभे ठाकले आहे.

यासाठी अशा गुन्ह्यात सापडलेल्या किंवा त्या मार्गावर जाणाऱ्या तरुणाईचे मन परिवर्तन करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता आहे. याकरिता बाल मानसतज्ञांची, समुपदेशकांची मदत घेण्याची गरज आहे. सांगलीत अशा तज्ञांची कमतरता नाही. त्यांची मदत घेऊन तरुणाईत सकारात्मक बदल घडविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.