yuva MAharashtra हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटवताना, राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमा घेऊन मुस्लिम समाजाची मूकनिदर्शने !

हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटवताना, राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमा घेऊन मुस्लिम समाजाची मूकनिदर्शने !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी 

| सांगली समाचार वृत्त |
हुपरी - दि. ११ जानेवारी २०२५
हुपरी येथील यशवंत नगर परिसरातील वादग्रस्त मदरसा बाबत येथील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्याने हा मदरसा वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी होता. योग्य ती कागदपत्रे प्रशासनाला सादर न केल्याने प्रशासनाने या मदरशाचे अतिक्रमण कार्यवाही अखेर आज पूर्ण केली. यावेळी कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी हातात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन काही काळ शांततेत मुक निदर्शने केली. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून, हा मदरसा हटवण्याची कार्यवाही पूर्ण केली.

याबाबत अधिक माहिती अशी की हुपरी शहरांतील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी मालमत्ता क्रमांक ४४८९ या मिळकतीवर मुस्लिम सुन्नत जमियतने बेकायदेशीररित्या उभारलेल्या मदरसा जमिनीच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवाना व इतर अनुषंगिक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने मुस्लिम सुन्नत जामियतला बजावली होती. मात्र मुस्लिम सुन्नत जामियतने शेवटपर्यंत कागदोपत्री पुरावा सादर केलाच नाही. तसेच सरकारी गायरानावरती बेकायदेशीररित्या मदरसाचे बांधकाम केले असल्याचे शासकीय कागदपत्रातून व आत्तापर्यंतच्या न्यायालयीन लढाईतून सिद्ध झाल्याने प्रशासनाने शनिवारी हा वादग्रस्त मदरसा हटविण्याची कारवाई केली. 


यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, प्रांताधिकारी मौसमी बर्डे - चौगुले, अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलिस निरिक्षक एन आर चौखंडे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या कार्यवाही वेळी मुस्लिम बांधवांनी हातात राष्ट्रपुरुषाच्या तस्वीरी घेऊन केलेली मूकनिदर्शने हा हुपरी शहरात व जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.