| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० जानेवारी २०२५
नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन गृहमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय नेते दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जुन्या कधीतरित्या भ्रष्टाचार प्रकरणी आर आर पाटील यांच्यावर टीका केली होती. जी पाटील कुटुंबियांबरोबर येथील मतदारांच्या जिव्हारी लागली होती. यावरून अजित पवार यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती...
अर्थात या निवडणुकीत ज्या पक्षाकडून रोहित आर पाटील यांनी निवडणूक लढविली होती, त्या राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचा पूर्ण धुव्वा उडाला. या पक्षाचे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार सध्या विधानसभेत पोहोचले आहेत. अशातच दोन्ही राष्ट्रवादी ( शरद पवार व अजित पवार यांचे गट) पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या वारंवार विविध प्रसार माध्यमातून प्रकाशित होत असतात.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर याला राजकीय वळण देण्यात येत असतानाच, तासगाव कवठेमंकाळचे नवनिर्वाचित आमदार रोहित आर पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र स्वतः पाटील यांनी या भेटीचा किस्सा सांगून, ही भेट राजकीय नसल्याचा खुलासा केला आहे.
काय सांगितले रोहित पाटील यांनी
"आज राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेत सांगली जिल्ह्यातील सामान्य घरातील मुलांना ज्या हॉस्टेलने आसरा देण्याचे काम केले त्या सांगली शहरातील महात्मा गांधी वसतिगृहाची माहिती देत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. दादांनी तत्परतेने ग्रामविकास खात्याने प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधत निधी देण्याबाबत सूचना केली व त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विशेष तरतूद करण्याचे आश्वासन देखील दिले. त्याचबरोबर मतदरसंघातील कामांबाबत मागणी केली,"
विशेष बाब म्हणजे स्व. आर. आर. पाटील हे स्वतः या महात्मा गांधी वस्तीगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. सांगलीतील मार्केट यार्ड जवळील महात्मा गांधी वसतिगृह ते वसंत दादा शेतकरी सहकारी साखर कारखाना समोरील शांतिनिकेतन पर्यंत स्व. आर. आर. पाटील हे चालत जात होते, याचे स्मरण या निमित्ताने सांगलीकरांना झाल्याशिवाय राहिले नाही. यानिमित्ताने अजित दादा पवार यांच्या मनाचा मोठेपणा ही अधोरेख येथे झाल्याशिवाय राहत नाही.