yuva MAharashtra भारती विद्यापीठातर्फे चर्याशिरोमणी आचार्यश्री विशुध्दसागजी महाराज यांना ‘डी.लिट्.' पदवी बहाल करणार : आ. डॉ. विश्वजित कदम !

भारती विद्यापीठातर्फे चर्याशिरोमणी आचार्यश्री विशुध्दसागजी महाराज यांना ‘डी.लिट्.' पदवी बहाल करणार : आ. डॉ. विश्वजित कदम !


| सांगली समाचार वृत्त |
नांदणी - दि. ९ जानेवारी २०२५
चर्याशिरोमणी, अध्यात्मयोगी प.पू.108 आचार्यश्री विशुद्धसागरजी महाराज यांचे साहित्यामध्ये प्रचंड योगदान आहे. दिगंबर जैन मुनींची जी कठोर चर्या आहे त्या चर्येचे पालन करणारे हे भारतवर्षातील अग्रगण्य दिगंबर जैन आचार्य आहेत. 550 हून अधिक मुनींचे नेतृत्व करणारे आचार्यश्रींच्या एकूणच कठोर मुनिचर्या आणि साहित्य पाहता त्यांना भारती विद्यापीठातर्फे ‌‘डी.लिट्' पदवी प्रदान करीत असल्याचे भारती विद्यापीठाचे प्रकुलगुरु व आमदार डॉ. विश्वजित पतंगराव कदम यांनी उपस्थित लाखो श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत जाहीर केले.

नांदणी येथे पूज्य आचार्यश्रींच्या मंगल सानिध्यामध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होतो आहे. या पूजा महोत्सव महासोहळ्यास आमदार डॉ. विश्वजित कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पूज्य आचार्यश्रींचा तसेच पूज्य भट्टारकांचा आशिर्वाद घेतला.


ते पुढे म्हणाले, ज्यांनी सत्यार्थ बोध, कर्म विपाक यासह 250 हून अधिक महान ग्रंथांची रचना केली असून त्यांच्या ‌‘वस्तुत्व महाकाव्य' या महाव्याचा गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदणी झाली आहे. यापूर्वी भारती विद्यापीठातर्फे सन 2019 मध्ये संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांना ‌‘डी.लिट्' पदवी बहाल करण्यात आली होती. चर्या आणि विद्वत्तेने परिपूर्ण अशा आचार्यश्रींच्या एकूण कार्यामुळे ही उपाधी देताना भारती विद्यापीठ स्वत:ला गौरवान्वित समजते. 

तत्पूर्वी नांदणी मठाचे प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा मंगल कलश, शाल श्रीफळ देवून सन्मान करून आपल्या आशीर्वचनामध्ये पूज्य आचार्यश्रींना ‌‘डी.लिट्' पदवी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यासंबंधीची सर्व कागदपत्राविषयींचा पाठपुरावा दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन व पंचकल्याण प्रतिष्ठा पूजा महोत्सव व महामस्तकाभिषकाचे उपाध्यक्ष रावसाहेब जि.पाटील करीत असल्याचे नमूद केले होते.

यावेळी पूज्य आचार्यसंघ, 70 हून अधिक मुनी-आर्यिकासह चारूकीर्ति भट्टारक महास्वामीजी श्रवणबेळगोळ, देवेंद्रकीर्ति भट्टारक महास्वामी ज्वालामालिनी, कर्नाटकाचे माजी मंत्री श्रीमंतकाका पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, सावकार मादनाईक, उद्योगपती राजू पाटील, राजू झेले, आप्पा भगाटे, सागर शंभूशेटे यांच्यासह लाखो श्रावक-श्राविका उपस्थित होते.