yuva MAharashtra नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची, डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची पुन्हा मागणी !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची, डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची पुन्हा मागणी !

फोटो सौजन्य -  gatearchive 

| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २७ जानेवारी २०२५

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या योद्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या अग्नीकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रहक्काने घेतले जाते. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान निश्चितच उच्च कोटीचे आहे. जर त्यांचा आकस्मित मृत्यू झाला नसता, तर त्यांच्या बाबतीत वेगळे चित्र दिसले असते, याप्रमाणेच त्यांच्या मृत्यूबाबतही नेहमीच शंका घेतले जाते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, सत्य सामोरे यावे, यासाठी अधून मधून मागणी केली जाते. अशा मागणी करणाऱ्यांमध्ये डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव आघाडीवर असते. आता पुन्हा एकदा त्यांनी हीच मागणी मोदी सरकारकडे केली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तैवानमध्ये अचानक मृत्यू झाला नाही, तर त्यांचा खून झाला, असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बारडोली येथे व्यक्त केला आहे. त्यांचे मत आहे की तत्कालीन सरकारने पुरावे दडपून देशातील जनतेपासून सत्य लपवले. डॉ. स्वामी बारडोली येथे 'रन टू रिमेम्बर सुभाष संग्राम' मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी आले होते, ज्यामध्ये सुमारे २ सहस्र धावपटू सहभागी झाले होते.

डॉ. स्वामी यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नेहरूंनी १९४५ मध्ये ब्रिटिश पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, 'सुभाषचंद्र बोस अजूनही जिवंत आहेत आणि आमच्या ताब्यात आहेत. आम्हाला पुढे काय करायचं ते ठरवावं लागेल.'

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, नेताजींच्या मृत्यूचे सत्य शोधून बाहेर आणले पाहिजे, कारण तैवानमध्ये त्यांचा मृत्यू झाला नाही. अमेरिकेनेही त्याबद्दल काहीही माहिती दिली नव्हती.


तसेच, डॉ. स्वामी यांनी मागणी केली की, या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत, ज्यामुळे सत्य समोर येईल. त्यांनी सूचित केले की, नरेंद्र मोदी सरकारने या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, परंतु ती पुढे नेली गेली नाही.

त्यामुळे आता मोदी सरकारने याबाबत आवश्यक ती पावले उचलून भारतीय जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळविलेल्या स्वातंत्र्य योद्धा नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून, याबाबतच्या फाईलवरील धूळ झटकून सत्य भारतीय जनतेसमोर आणण्याची आवश्यकता आहे.