yuva MAharashtra वारणा उद्भवू राहू दे, तर सांगलीकरांसाठी थेट चांदोलीतून पाणी सोडा पृथ्वीराज पवार यांची मागणी !

वारणा उद्भवू राहू दे, तर सांगलीकरांसाठी थेट चांदोलीतून पाणी सोडा पृथ्वीराज पवार यांची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जानेवारी २०२५
कृष्णा नदी इतकीच वारणा नदीही प्रदूषित झाली आहे. शेरीनाला हा गेल्या 40 वर्षांपासून पाणी प्रदूषणाचा एक प्रमुख धोका होता. पण आज एक शेरीनालाच नव्हे, तर उगमापासून सांगलीपर्यंत दोन्ही नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कारखाने, डेअरी, व उद्योग वसाहती, त्याचप्रमाणे विविध गावांचे, तसेच शहरांचे सांडपाणी आणि शेतीचे रासायनिक पाणी मिसळत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग किती काळ करणार आहात ? त्यापेक्षा चांदोली धरणातून थेट पाणी आणण्याचा विचार करावा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करू अशी भूमिका भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी महापालिका आयुक्त शुभम यांच्याकडे मांडली आहे.

वारणा उद्भव योजनेचे स्वप्नरंजनात रमण्यापेक्षा, वास्तवाचे भान ठेवून महापालिकेने निर्णय घेतला पाहिजे. वारणा नदीत मासे आणि मगर मरत असेल तर ते पाणी आता पिण्या योग्य राहिले आहे का ?असा सवाल पृथ्वीराज पवार यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कृष्णा नदीत सांगली येथे शेरी नाला मिसळतो. मात्र उगमापासून 29 पेक्षा जास्त मोठ्या गावांचे, तीन मोठे शहरांचे सांडपाणी, साखर कारखान्यांचे मळी मिश्रित पाणी आणि हजारो एकर ऊस शेतीचे रासायनिक पाणी नदीत मिसळते आहे. हीच अवस्था वारणा नदी बाबत झाली आहे अशावेळी कृष्णेतून उठायचे आणि वारणेत पंप सोडायचे हा प्रयोग पैशांचा अपव्यय ठरणार आहे.


शेरीनाला योजना सहा महिन्यात मार्गी लागली, तरीही तो चकवाच ठरेल. कृष्णा वारणा नदीच्या प्रदूषणाच्या समस्येमुळे येत्या एक-दीड दशकात नदी मृत घोषित करावी लागेल, इतक्या गंभीर वळणावर आली आहे. त्याच्याशी समस्त सांगलीकरांनी एकजुटीने स्वतंत्रपणे लढावे लागेल त्यासाठी हे आमची तयारी आहे.

वारणा उद्भव योजना हट्टाने रेटण्याचा प्रयत्न महापालिकेने करू नये. हा पैसा पाण्यात जाईल. आणि पुन्हा 25-30 वर्षे शासन सांगलीच्या पाणी योजनेला नव्याने पैसे देणार नाही. त्यामुळे आत्ताच विचारपूर्वक निर्णय घ्यावा. चांदोली धरणातून थेट पाणी तेही सायपन पद्धतीने आणणे शक्य आहे त्यावर अभ्यास झाला आहे. त्याचा एक प्रारूप आराखडा लवकरच तयार करून महापालिकेस देत आहोत. हवी तर शासनाकडून पुन्हा एकदा अभ्यास समिती नेमूया. कोल्हापूर शहराला काळमवाडी धरणातून पाणी येऊ शकते, तर सांगलीलाही चांदोली इथून पाणी आणता येईल. हा व्यापक व दीर्घकालीन हिताचा निर्णय आहे. पक्ष, गटतट सारे बाजूला ठेवून सांगलीकर त्याला साथ देतील. सांगलीच्या लोकांच्या जिविताचा विचार करा. अशी आग्रही भूमिका पृथ्वीराज पवार यांनी आयुक्तांसमोर मांडली.