yuva MAharashtra आचार्य शांतीसागर महाराजांनी अखंड धर्मासाठी महान कार्य केले - प. पू. आचार्य विशुद्धसागर महाराज

आचार्य शांतीसागर महाराजांनी अखंड धर्मासाठी महान कार्य केले - प. पू. आचार्य विशुद्धसागर महाराज


| सांगली समाचार वृत्त |
नांदणी - दि. ३ जानेवारी २०२५
जैन धर्मामध्ये आचार्य भद्रबाहूपासून ते शांतीसागर महाराजांपर्यंत अनेक आचार्य साधू झाले. त्यांनी चांगले कार्य केले. आचार्य शांतीसागर महाराजांनी अखंड देशात अखंड धर्मासाठी महान कार्य केल्याने उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत नावलौकिक मिळवून अमर ठरले आहेत, असे प्रतिपादन आचार्य विशुद्धसागर महाराज यांनी केले.

नांदणी येथे सुरू असलेल्या आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी आचार्य विशुद्धसागर महाराज यांचे प्रवचन झाले. ते म्हणाले, जैन भगवंत यांनी मानव जातीच्या आत्महिताचे ज्ञान दिले. वस्तू पवित्र करण्यापेक्षा दृष्टीला पवित्र करा. आचार्य साधू हे पृथ्वीतलावरील जिवंत देव आहेत. प्रत्येक सम्यक जीवाला साधू हे दिगंबर देव दिसतात.


यापूर्वी आर्यिका ज्ञानमती माताजी यांनी आपल्या प्रवचनात अस्तित्व व वस्तुत्व गुणांची माहिती दिली. शुद्धोपयोग महाराज व विद्यासागर महाराजांचे प्रवचन झाले. विद्यासागर महाराजांनी स्वाध्याय व जिनवाणी आचरण उपासना याचे उपदेश केले.

या महामहोत्सवासाठी कर्नाटकातील कंबदहल्ली येथील मठाधिपती भानुकीर्ती महास्वामी यांचे आगमन झाले. यावेळी मंचावर माजी खास. कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आम. प्रकाश आवाडे, आम. राजेंद्र पाटील, अरिहंत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन उद्योगपती उत्तम पाटील उपस्थित होते. सकाळपासून शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत पाटील आसगावकर, रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम, पुंडलिकराव जाधव नांदणीचे सुपुत्र यवतमाळचे उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, तेरदाळ येथील मठसंस्थांचे विश्वस्त यांचे सह मान्यवर उपस्थित होते.

दिवसभरामध्ये संस्थानमध्ये पीठा रोहण हा धार्मिक विधी पार पडल्यानंतर उपस्थित आचार्यांचे प्रवचन झाले. त्यानंतर मिरवणूक, जलकुंभ आणणे, देवीची मूर्ती शुद्धी, गर्भकल्याण विधान, गर्भसंस्कार, अष्ट कुमारी काद्वारे मातीची सेवा, सोळा स्वप्ने, त्यांचे वर्णन आणि शेवटी संगीता आरती हे कार्यक्रम संपन्न झाले.