| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ९ जानेवारी २०२५
वंशाला दिवा हवा म्हणून अनेक पणत्यांना विझवण्याचे दुर्दैवी प्रकार पुरोगामी महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी होत असतात. मुलींची संख्या कमी होत असल्याने शासनाने या विरोधात कडक कारवाई करण्याचे नंतर ही भ्रूणहत्या चे प्रकार कमी झाले असले तरी, मुलाच्या हव्यासापाई एकापेक्षा अनेक अपत्ये जन्मास घालून, आपत्ती ओढणारे प्रकार केवळ अशिक्षित कुटुंबातच नव्हे तर सुशिक्षित कुटुंबातही आढळून येतात. परंतु बुरसटलेले विचारांचे शासकीय अधिकारी जेव्हा असे प्रकार करतात, तेव्हा दिव्याखाली अंधार असंच म्हणावे लागेल.
या प्रकाराला आळा बसावा म्हणून शासनाने दोन पेक्षा अधिक अपत्य असतील तर, शासकीय सेवेत अथवा सत्ता करण्यात सहभाग घेता येणार नाही असाही नियम करण्यात आला. मात्र या नियमाला कचऱ्याची टोपली दाखवून अनेक महाभाग तिसऱ्या अपत्याला जन्म देत असतात. नुकताच असाच एक प्रकार शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात आढळून आला. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना हा पुत्रमोह महागात पडला. तीन अपत्य असल्याकारणाने दांगट यांना आता सेवेतून कमी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 1 जुलै 2005 च्या परिपत्रकानुसार 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असल्यास संबंधित उमेदवाराचा नेमणुकी करीता विचार केला जाणार नाही. शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर नोटराईज केलेले अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. मात्र, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी रूजू होताना तसे प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. त्यांच्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती.
विविध कारणे पुढे करून त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर, महापालिका सर्वसाधारण सभेच्या अधिकाराच्या अंतर्गत श्रीनिवास दांगट यांना महापालिका सेवेतून कमी करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. तसे आदेश आयुक्त सिंह यांनी नुकतेच काढले आहेत. सध्या पिंपरी चिंचवड परिसरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.