yuva MAharashtra चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे कायदेविषयक जनजागृतीपर शिबीर संपन्न !

चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे कायदेविषयक जनजागृतीपर शिबीर संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या वतीने चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे गुरुवार, ३० जानेवारी २०२५ रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO ACT) 2012 तसेच रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. गिरीजेश कांबळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक ॲड. अमोल डोंबे यांनी POCSO कायदा 2012 संदर्भात विद्यार्थिनींना सखोल माहिती दिली. त्यांनी समाजातील सर्व नागरिकांनी या विषयावर जागरूक राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुलींनी कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला भीक न घालता स्वतःचे स्थान निर्माण करावे, तसेच कायद्याचे संरक्षण आणि त्याचा योग्य उपयोग समजून घ्यावा, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सिंगापूर देशाच्या उदाहरणाद्वारे प्रभावी कायदे व त्यांची काटेकोर अंमलबजावणी कशी देशाच्या प्रगतीस मदत करते, यावर प्रकाश टाकला.


तसेच मा. श्री. शेखर निकम, पोलीस उपनिरीक्षक, सांगली यांनी वाहतुकीचे नियम आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, वाहन परवाना नसलेल्या १८ वर्षाखालील व्यक्तींनी वाहन चालवू नये, तसेच वाहतुकीच्या चिन्हांची माहिती प्रत्येकाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले. वाहतूक शाखेचे प्रविण माळी यांनी "महा ट्रॅफिक" ॲप बाबत माहिती दिली आणि उपस्थित विद्यार्थिनींना ते डाउनलोड करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मा. श्री. गिरीजेश कांबळे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या भूमिका आणि कार्यप्रणालीबद्दल माहिती दिली. त्यांनी मोटार वाहन कायदा आणि मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम यावरही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जस्मीन मुजावर, प्रास्ताविक श्रीमती शोभा पवार, तर आभार प्रदर्शन डॉ. सुजाता कराडे यांनी केले. यावेळी विजय कोगनोळे, नितीन आंबेकर, वैभव सूर्यवंशी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातमी व फोटो सौजन्य- अभिजित शिंदे